आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:औषधोपचारासाठी पैसे नसल्याने एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, तेलंगवाडी येथील घटना

हिंगोली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्याला पाच वर्षापासून होता पोटाचा आजार, जंगलात गळफास घेऊन संपवले जीवन

कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी येथे पोटाच्या आजाराच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ता. 11 सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी येथील दाजीबा गोमाजी खुडे (५५) यांना मागील चार ते पाच वर्षापासून पोटाचा आजार होता. वारंवार पोट दुखत असल्यांनी त्यांनी औषधोपचारही केले होते. मात्र पैसे खर्च करून देखील पोटाचा आजार कमी होत नव्हता. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. शिवाय त्यांच्याकडे केवळ तीन एकर कोरडवाहू शेत जमीन असून त्यामध्ये दोन मुलांचा संसाराचा गाडा चालवावा लागत होता. शेती उत्पन्न कमी अन खर्च अधिक होत होता. तर यावर्षी शेतातून काही उत्पन्नही मिळाले नाही. त्यामुळे औषधोपचारासाठी पैसे कमी पडू लागले होते. पोटाचा आजार कमी होत नसल्याने त्यांची प्रकृती बिघडत होती. शुक्रवारी ता. 10 सकाळी नऊ वाजता खुडे हे कोणालाही न सांगता बाहेर निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. आज सकाळी गावातील काही तरुणांनी माळरानाकडील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यावरून खुडे यांच्या कुटुंबियांनी माळरानाकडील जंगलात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी दाजीबा गोमाजी खुडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार डी. एस. सुर्य यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी संभाजी दाजीबा खुडे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...