आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Farmers Life Was Stuck On The Embankment, Politics Was Under 'survey'; Fadnavis Attack On Ajit Pawar, Darekar Attack On Uddhav Thackeray

मदतीचा टाहो:बळीराजाचे जीवन बांधावरच अडले, ‘पाहणी’च्या आडून राजकारण नडले; फडणवीसांचे अजितदादांवर संधान, दरेकरांचा ठाकरेंवर बाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... अन् इकडे ‘मी आज मरतो’ म्हणत शहापुरात शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

अतिवृष्टीने महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिके पाण्यात गेल्याने एकीकडे शेतकरी हतबल असताना सत्ताधारी-विरोधकांचे मुंबईतील राजकारण गेल्या आठवड्यापासून पाहणी दौऱ्याच्या रूपात बांधाबांधावर आले आहे. दरम्यान, मंगळवारी यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या ५० हजार ते दीड लाखापर्यंतच्या मदतीच्या मागणीच्या बातम्या जाहीरपणे दाखवत “आता मदत कुठे अडत आहे?’ अशा शैलीत संधान साधले. तर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “नुसतेच भावनिक बोलू नका, मदत द्या...’, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, एकीकडे हे राजकारण तापलेले असताना अंबड तालुक्यात शहापूरमध्ये एका शेतकऱ्याने अतिवृष्टीचे संकट आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.

... अन् इकडे ‘मी आज मरतो’ म्हणत शहापुरात शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

अंबड तालुक्यातील शहापूर येथील शेतकरी शिवाजी आसाराम काळे (४०) यांनी सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. अतिवृष्टीने शेतीत होत्याचे नव्हते झाले आणि कर्जाचा डोंगर यामुळे सतत तणावात असलेले काळे शेती-कर्जाच्या विषयावरून घरी कमी-अधिक बोलणे सुरू असताना “आता मी मरतोच’ म्हणाले आणि दुपारनंतर त्यांचा मृतदेह शेतात सापडला. घरात अनेकदा किरकोळ वाद होत. तेव्हा ते नेहमी “आता मी मरतोच’ असे म्हणून आत्मक्लेश करून घेतला.

चौकशा लावून तोंड बंद करू शकत नाहीत :

जलयुक्त शिवारच्या कामांसंदर्भातले अधिकार स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सरकारने चौकशी जरूर करावी. अशा चौकशा लावून विरोधी पक्षाचे तोंड बंद करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.

अजित पवारांनी तेव्हा केली होती ५० हजार ते दीड लाख मदतीची मागणी

उस्मानाबाद | ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते सोमवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर खरीप पिकांसाठी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी दीड ते दोन लाख रुपये देण्याच्या मागणीच्या बातम्या पत्रकार परिषदेत दाखवल्या. “मी काळजीवाहू मुख्यमंत्री असतानाही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. सध्याची परिस्थिती पाहता, मी राजकारणावर काहीही बाेलणार नव्हतो. मात्र तुम्ही राजकारणावर बोलाल तर मीही त्याला उत्तर देईन, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

फडणवीस सरकारने तेव्हा निकष बदलून दिली होती तिप्पट भरपाई

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे ३० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यांना किती भरपाई द्यावी, यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगलीच्या महापुरात नुकसान झालेल्यांना किती मदत मिळाली, याची माहिती ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घेतली. तेव्हा तत्कालीन फडणवीस सरकारने काही निकष बदलून तिप्पट भरपाई दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

यंदा लातूर, उस्मानाबादेत तर अस्मानी संकट कोसळले. अशीच स्थिती १ ते ९ ऑगस्ट २०१९ कालावधीत कोल्हापूर, सांगली भागात होती. तेथे तत्कालीन राज्य सरकारने एक हेक्टरपर्यंत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी) निकषापेक्षा तिप्पट भरपाई दिली होती. त्यासाठी ११ सप्टेंबर २०१९ रोजी एक अध्यादेश काढला होता. त्यात एक हेक्टरपर्यंतच्या कर्जाला माफी देण्यात आली होती. एनडीआरएफचा भरपाईचा निकष कोरडवाहूला प्रतिहेक्टर ६८०० तर बागायतीला १३,५०० रुपये आहे. तो बदलून कोरडवाहूला १८,००० आणि बागायतीला ३९ हजार असा करण्यात आला.

काँग्रेसला हवा जीएसटी परतावा, म्हणून केंद्राचा धावा...

मुंबई | कोरोना अन् आता अतिवृष्टीने राज्यात अतोनात नुकसान झाले. राज्याचे हक्काचे जीएसटी परताव्याचे ३० हजार कोटी केंद्राकडून येणे बाकी आहेत. ते त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...