आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वीजवाहिनी अंगावर पडल्याने बापलेकाचा जागेवरच मृत्यू, वसमत शहरालगत घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत शहरालगत कवठा रोड भागात वीटभट्टीवर काम करणाऱ्या बापलेकाच्या अंगावर वीज वाहिनी पडल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. ६ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत शहरालगत कवठा रोड भागात वीटभट्टी आहेत. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील बेटसावंगी येथील रामदास किशन सोनटक्के व त्यांचे कुटुंबीय कामाला आहे. मागील काही वर्षापासून सोनटक्के कुटुंबीय या ठिकाणी काम करून उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रामदास किसन सोनटक्के (५५) व त्यांचा मुलगा पांडुरंग रामदास सोनटक्के (२६) त्यांची पत्नी राणी सोनटक्के व अन्य एक मुलगा कामासाठी आले होते. मात्र अर्धा तास काम केल्यानंतर राणी सोनटक्के व त्यांचा मुलगा चहा पिण्यासाठी बाजूलाच असलेल्या त्यांच्या घरी गेले. तर वीटभट्टीवर रामदास सोनटक्के व पांडुरंग सोनटक्के हे दोघे बापलेक काम करत होते. यावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पंधरा मिनिटांनंतर पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर अचानक विज वाहिनी मध्ये स्पार्किंग होऊन वीजवाहिनी तुटली. यावेळी तुटलेली विज वाहिनी रामदास सोनटक्के यांच्या पायात अडकली तर पांडुरंग याच्या हातावर पडली. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर प्रकार इतर ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वीज कंपनीला माहिती दिली. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरिक्षक खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, चाटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...