आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑनलाइन शिक्षण:पहिली, दुसरीची शाळा ऑनलाइन; सोमवार ते शुक्रवार अर्धातासांचे सत्र

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • नव्याने ऑनलाइन शिक्षणाचे वेळापत्रक जाहिर

कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षपणे सुरु करणे शक्य नसल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशामधून नर्सरी, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले होते. आता शासनाने नव्याने ऑनलाईन शिक्षणासाठी वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासांची सत्रे सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पुर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही अर्धातासाचे सत्र ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अद्याप नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करत स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि शाळा समितीवर सोपवण्यात आला होता. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतची अंदाजे तारखाही शिक्षण विभागाकडून शाळांना देत ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत आता राज्य सरकारने ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. शासनाने पुर्वी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत परीपत्रक काढले होते. यामधून पुर्वप्राथमिक, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देवू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, आता २२ तारखेला जारी करण्यात आलेल्या आदेशात शासनाने ऑनलाईन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार अर्धा तासांची दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण देण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग भरणार आहेत. तसेच पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज अर्धा तास ऑनलाईन वर्ग घेऊन पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन करायचे आहे. तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे व नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांची चार सत्रे ऑनलाईन घेण्याची सूचना शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.