आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:राज्यात आजपासून पाच दिवस पूर्वमोसमी पावसाचे, अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 12 ते 16 मे या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना

अरबी समुद्रात येत्या तीन ते चार दिवसांत चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यातच विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात कायम अाहे. तसेच उत्तर ते दक्षिण कमी दाबाचा पट्टा विदर्भ व लगतच्या भागापासून मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटक मार्गे उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झाला आहे. परिणामी राज्यात १२ ते १६ मे या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, आग्नेय अरबी समुद्रात १४ मेच्या सकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र नंतर आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप बेटाजवळ सक्रिय राहील. दोन दिवसांनी दि. १६ मे रोजी या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते उत्तर ते वायव्य अरबी समुद्रात ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा तूर्तास महाराष्ट्राच्या किनारपट्टीला फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या वादळी प्रणालीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते. कुलाबा वेधशाळेनुसार, दि. १४ ते १७ मे या काळात राज्याच्या दक्षिण किनाऱ्यावर वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांत शक्यता

  • १२ व १३ मे : भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
  • १४ मे : सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया
  • १५ व १६ मे : बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा.
बातम्या आणखी आहेत...