आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ उडवणारा लेटर बॉम्ब:आयपीएस कृष्ण प्रकाशांसाठी 200 कोटींची वसुली केल्याचे खोटे पत्र व्हायरल, नेमके प्रकरण काय?

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएस अधिकारी आणि पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी आपण​​​​​​ 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल केली, असे सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले खोटे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे पत्र आपण लिहिले नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.

पत्रात नेमके काय?

कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या व्हायरल पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता आहे. यापासून मला संरक्षण मिळावे. मी नऊ वर्षांपू्र्वी फौजदार म्हणून पोलिस दलात भरती झालो. त्यानंतर माझी नियुक्ती तीन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाली. येथे पोलिस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश आले. त्यांच्याकडे मी शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्यात माझी नेमणूक करावी, अशी मागणी केली. मात्र, त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविले. शहरातील अनेक जमिनीची खरेदी-विक्री प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून कोट्यवधी रुपये मिळाले. हा पैसा स्वीकारण्यास मला सांगण्यात आले. आतापर्यंत मी आयुक्तांसाठी किमान 200 कोटीं रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

पोलिस अधिकारी सहभागी

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त असताना कृष्ण प्रकाश यांनी जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणात वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप या व्हायरल पत्रात करण्यात आला आहे. या पत्रात चार सहाय्यक पोलिस आयुक्त, चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या साऱ्यांच्या मदतीने कृष्ण प्रकाश यांनी हे कारनामे केल्याचे पत्रात म्हटले आहे. हे पत्र लिहिल्यानंतर आपल्यावर दबाव येऊ शकतो. धमकावले जाऊ शकते. मात्र, आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

आपल्या जीवाला धोका

पत्रात पुढे म्हटले आहे की, या काळात आपल्याला अनेक बांधकाम व्यावसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती कामे करायला लावली. चार वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना मीडियाला पैसे द्यावे लागले. मीडियाला या लोकांना हाताशी धरून त्यांची सर्वसामान्यांमधील प्रतिमा उंचवण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे कार्यकर्ते सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या पत्रानंतर त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व व्यवहाराचे पुरावे आपल्याजवळ आहेत. त्यात फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती आहे. चार पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना या कामी मदत केली. यातील पैसे मी आयुक्त सांगितील तिथे पोहचवायचो. मात्र, यातला एकही पैसा स्वतःसाठी वापरला नाही.

पोलिस आयुक्तांकडे तक्रार

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आणि व्हायरल झालेल्या पत्रावर अर्जदार म्हणून सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांचे नाव आहे. मात्र, हे पत्र आपण लिहिले नसल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांकडे एक तक्रार नोंदवली आहे. त्यात या पत्रामुळे पोलिस दलाची बदनामी होत असून, या प्रकरणाच्या सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...