आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक:बायोडिझेल पेट्रोलपंपाची एजन्सी देण्याच्या नावाखाली 15 लाखाची फसवणुक, कंपनीच्या मुंबई येथील 9 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवारात बायोडिझेल पेट्रोलपंपाची एजन्सी देण्याच्या नावाखाली कुरुंदा येथील व्यक्तीची १५ लाख रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी मुंबई येथील इंडीझेल माय इको एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या ९ जणांवर कुरूंदा पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ९ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील मुंजाजी धोंडजी इंगोले यांनी सोशल मिडीया व इतर ठिकाणी बायोडिझेल पेट्रोल पंपाची एजन्सी देण्याची जाहिरात बघितली होती. त्यानुसार त्यांनी मुंबई येथील या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी नांदेड येेथे सेमीनार आयोजित करून आता पुढील काळ बायोडिझेलचा असणार असल्याचे सांगत एजन्सी दिली जाणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार इंगोले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कागदपत्रे जमा केली. सन २०१७ पासून त्यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर कंपनीने त्यांना वेळोवेळी चार ते पाच लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या आयसीअायसीआय बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार इंगोले यांनी रक्कम जमा केली. अन कुरुंदा शिवारात जागा भाड्यानेही घेतली. मात्र त्यानंतर कंपनीकडून एजन्सी देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली.

दरम्यान, आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इंगोले यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तसेच वसमतच्या न्यायालयातही या संदर्भात अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून इंगोले यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी मुंबई येथील इंडीझेल माय इको एनर्जी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे व्यवसाय संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये संतोष वर्मा, जयंत जगन्नाथ केसकर, सचिन साहेबराव लबडे, सारिका अनिरुध्द शिंदे (सर्व व्यवसाय संचालक), पराग कामत, सतीश भुरसेल, योगेश भदुका, कुणाल गुप्ता (व्यवसाय व्यवस्थापक, सर्व रा. मधुहंस बिल्डींग, २६३ डॉ. ॲनी बेझंट रोड वरळी, मुंबई) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार पुढील तपास करीत आहेत.

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व गुजरातमध्ये झाले सेमीनार : मंुजाजी इंगोले, तक्रारदार कुरुंदा
या कंपनीने महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व गुजरात राज्यात सेमीनार झाले आहेत. त्यातून महाराष्ट्रात अनेकांची फसवणुक झाल्याची शक्यता आहे. संबंधीत कंपनीकडून पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई येथे कंपनीच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी लवकरच एजन्सी देऊ असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर दुसऱ्या वेळी कंपनीचे कार्यालयच बदलले आहे.

बातम्या आणखी आहेत...