आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पेरमीली दलम कमांडर कुख्यात नक्षलवादी बिटलू मडावीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाला यश आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते.
यात ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठ्या घातपाताच्या तयारीत होता. अशी माहिती समोर आली आहे.
दोन्ही बाजूंनी गोळीबार
अहेरी भामरागड तालुक्याच्या सीमेवरील तीन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी कंठस्नान घातले. दरम्यान, दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जहाल नक्षलवादी ठार झाले. यामध्ये पेरमीली दलम कमांडर कुख्यात बिटलू मडावी याच्यासह डीव्हीसी वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला.
कोण होता बिटलू मडावी?
काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मर्दहूर येथील साईनाथ नरोटे हत्याप्रकरणात बिटलू मुख्य आरोपी होता.मागील दोन वर्षांपासून भामरागड परिसरात ‘बीटलू’ची मोठ्या प्रमाणात दहशत होती. त्याच भागातील रहिवासी असल्याने त्याला परिसराची चांगलीच माहिती होती. निडर आणि हिंसक वृत्तीमुळे त्याला लवकरच पेरमिली दलम कमांडर पद देण्यात आले. त्यांनतर तो अधिकच आक्रमक झाला.
घातपात टळला
महाराष्ट्रदिनी ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने नक्षल्यांची योजना निष्फळ ठरली. मर्दिनटोला चकमकीनंतर नक्षलवाद्यांमध्ये नेतृत्व पोकळी निर्माण झाली आहे. त्यात बीटलूसारखा कमांडर गमावणे नक्षल चळवळीला मोठा हादरा समजला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.