आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवू नये- उदय सामंत; शैक्षणिक विकासासाठी 5 वर्षांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या देखील सर्व विद्यापीठांना सुचना

गडचिरोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण विरहित काम तर जलद विकास हे सूत्र लक्षात घेऊन शासन, प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापन यांनी समन्वयातून काम करावे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा माझे ऐकले जात नाही, मला विचारले जात नाही हा अहंभाव सोडून काम करावे. विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवू नये, असे स्पष्ट मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज गडचिरोलीत केले. ते गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि दशमानोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, माजी कुलगुरु डॉ. विजय आईंचवार, डॉ. नामदेव कल्याणकर, डॉ. कीर्तिवर्धन दिक्षित यांच्यासह विविध शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

सामंत पूढे म्हणाले की, कोणत्याही विद्यापीठाचा विकास होण्यासाठी शासन, प्रशासन आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. विद्यापीठ मोठे की लहान आहे, यापेक्षा ते विद्यार्थी आणि समाजासाठी काय करते हे महत्वाचे आहे. गोंडवाना विद्यापीठाला लवकरच आदिवासी व वनविद्यापीठ म्हणून विशेष दर्जा दिला जाईल असे आश्वासन दिले. शैक्षणिक विकासासाठी ५ वर्षांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना सर्व विद्यापीठांना दिल्याचेही सामंत यांनी सांगितले. राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे त्यावेळी त्यांनी भरभरून कौतुक केले सामंत म्हणाले की कोरोनाच्या काळात या विद्यार्थ्यांनी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि परिचारिकांच्या बरोबरीने राज्यात कितीतरी ठिकाणी काम केले विद्यापीठांनी त्यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप ठेवली पाहिजे. आर.आर.पाटलांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी आणि आमदार कृष्णा गजभे यांनी नेहमीप्रमाणे समस्यांचा पाढा वाचला.

याप्रसंगी तळोधी(बाळापूर) येथील शिक्षण महर्षी डॉ. तु.वि.गेडाम यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी कुलगुरु डॉ. विजय आईंचवार, डॉ.नामदेव कल्याणकर व डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिवाय विद्यापीठातील उत्कृ्ष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. जीवन समर्थन प्रणाली रुग्णवाहिकेचे लोकार्पण, विद्यापीठाच्या परिसरात 101 रोपटे लावण्यात आले.

महापुरुषांच्या प्रतिमा खाली आणि पाहुणे मंचावर हे अयोग्य -

कार्यक्रम प्रसंगी सामंत यांना दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाचे वेळी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व अन्य महापुरुषांच्या प्रतिमा मंचाखाली ठेवलेल्या असल्याचे दिसले. मंचावरून खाली उतरून दीपप्रज्वलनाला जाताना त्यांना ही बाब खटकली त्यांनी आयोजकांना सांगून सर्व महापुरुषांच्या तसबिरी व समई मंचावर आणायला सांगितले आणि नंतर दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी या बाबीचा उल्लेख केला. ते म्हणाले की महापुरुषांच्या प्रतिमा मंचाखाली असणे आणि आम्ही सामान्य माणसे मंचावर असणे केवळ अयोग्य आहे. चुका सुधारल्या पाहिजेत असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. महापुरुषांच्या प्रतिमा माणसे बसतात त्या स्थानापेक्षा ऊच्चस्थानी असाव्यात, असा सन्मानजनक पायंडा सामंत यांनी पाडून दिला.

बातम्या आणखी आहेत...