आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचे विघ्न:विघ्नहर्त्याची मूर्ती तयार करणाऱ्यांवर ‘विघ्न’, अस्मानी संकटाने पेणची कारखानदारी ठप्प

महेश जोशी/ नितीश गोवंडे | पेण (रायगड)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना, निसर्ग, शासनाच्या नियमांसह ‘तौक्ते’ने गणेशमूर्ती व्यवसायावर संकट
  • चक्रीवादळामुळे १० ते १२ कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, चार फूट मूर्तीचे नियम, पुन्हा कोरोना आणि “तौक्ते’ चक्रीवादळ अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाने विघ्नहर्त्याची मूर्ती तयार करणाऱ्या पेण येथील कारखानदारांसमोर मोठे विघ्न उभे राहिले आहे. तौक्ते चक्रीवादळात १० ते १२ कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. वाहतूक बंद असल्याने कच्च्या मालाची आवक ठप्प झाली. तीन जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान केले. या काळात तयार मूर्ती शेतात उघड्यावर साठवून ठेवल्या जातात. वादळामुळे मूर्ती खराब झाल्या. कारखान्यांचे शेडही उडून गेले. त्यातच ऐन गणेशोत्सवात शासनाने ४ फुटांच्या मूर्तीची मर्यादा टाकली. तोपर्यंत उंच मूर्ती तयार होत्या. मात्र, संकटाच्या काळात शासनाला साथ देण्यासाठी मूर्तिकार तयार झाले. संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीत २ लाख रुपयांची मदतही केली. देशभरातील विक्रेते ४ फुटांच्या मूर्ती घेऊन गेले होते. मात्र, महापालिका, नगर परिषदांनी घरात विसर्जनाचा नियम केला. यामुळे विक्रेत्यांची पंचाईत झाली. ४ फुटांच्या मूर्ती घरात विसर्जित करणे शक्य नसल्याने नागरिकांनी लहान मूर्ती नेल्या. परिणामी ९० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्याची माहिती संघटनेचे माजी अध्यक्ष शंकर मोकल यांनी दिली.

निर्यातही ठप्प : पेण विभागात ४८० कारखान्यांची वार्षिक उलाढाल २५० कोटींच्या घरात आहे. एका कारखान्यात सरासरी ५ हजार तर हमरापूर विभागात प्रत्येक हंगामात २४ लाख मूर्ती तयार होतात. साेमवारीच्या “तौक्ते’ चक्रीवादळाचा या व्यवसायाला माेठा फटका बसला हमरापूर येथून दरवर्षी ८० ते ९० हजार मूर्ती परदेशात निर्यात होतात. गेल्या वर्षी विमान आणि जहाज वाहतूक बंद असल्याने त्यावर पाणी फेरले गेले. यंदाही तशीच स्थिती राहील, असे मोकल म्हणाले.

२५ लाख लोकांचा प्रश्न, सरकारची अनास्था
नैसर्गिक संकटांसह कारखान्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीची चिंता सतावतेय. मार्च २०२० पासून या संकटांवर मार्ग काढण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची ५-६ वेळेस भेट घेण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय राऊत व भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. सरकारच्या नजरेत आम्ही कलाकारच नसल्याची खंत महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सदस्य नितीन मोकल यांनी केली. राज्यात गणेशमूर्तीच्या व्यवसायाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या २५ लाख लोक संबंधित आहेत. यात १५ लाख मूर्तिकार तर टेम्पोचालक, माती विक्रेते, काथा विक्रेते, पेंटर आदींची संख्या १० लाख आहे.

बाळासाहेब जिवंत असते तर...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलाप्रेमी होते. ते आज असते तर मूर्ती कारखानादारांवरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी वाटेल ते केले असते. -राजन पाटील, सचिव, हमरापूर गणेश मूर्तिकार संघटना

सरकारने उंची स्पष्ट करावी
गेल्या वर्षी मूर्ती तयार झाल्यावर शासनाने ४ फुटांचा नियम काढला. आम्ही त्यास पाठिंबा दिला. या वर्षी नेमका काय नियम असेल, हे सरकारने स्पष्ट करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करताेय. पण सरकारकडून काहीच माहिती मिळत नाही. -नितीन मोकल, सदस्य, महाराष्ट्र मूर्तिकार संघटना

‘तौक्ते’ने केले नुकसान
मूर्तिकार संघटनेचे माजी अध्यक्ष कृणाल पाटील यांच्या कृणाल आर्ट‌्स कारखान्याला तौक्तेचा जबर तडाखा बसला. कारखान्याचे ४० पत्रे उडून गेले. त्यातून पावसाचे पाणी आल्याने ५०० च्या वर तयार मूर्ती भिजल्या. काही तुटल्या. ३ ते ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार या वादळाने कारखादारांचे १० ते १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, पंचनाम्यानंतरच स्पष्ट होईल, असे पाटील यांचे मत आहे.६५ कोटींच्या कर्जाचा बोजा
हमरापूर विभागातील कारखान्यांनी मागील वर्षी बँकांकडून सुमारे ६५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्यवसाय न झाल्याने एकही कारखानाचालक कर्जाचे हप्ते भरू नाही शकले. बँकांकडून सध्या तगादा नाही, मात्र, बँका किती दिवस थांबतील? शासन सातत्याने शेतकरी कर्जमाफी करते, त्या धर्तीवर आमचीही कर्जमाफी करावी, अशी मागणी संघटनेचे सचिव राजन पाटील यांनी केली आहे.

मूर्ती पडून, हप्ते थकले
ऐश्वर्या कला केंद्राचे संचालक अरविंद पाटील यांनी गेल्या वर्षी कच्च्या मालासाठी १२ लाखांचे कर्ज घेतले होते. ग्रामपंचायतीने गणेशोत्सवात दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यापूर्वी विकल्या तेवढाच काय तो फायदा झाला. आता कर्ज थकले आहे. विक्री नसल्याने हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत. माल पडून आहे तोच यंदा विकू. पुन्हा लाॅकडाऊन राहिला तर जगणे कठीण होऊन जाईल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...