आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे अार्थिक नुकसान:हायस्पीड इंटरनेटद्वारे कॉलिंग सेंटर चालवणारी टोळी अटकेत, दोघांविरोधात रत्नागिरीत गुन्हा दाखल

रायगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य दहशतवादविरोधी पथकासह रत्नागिरी शहर पोलिसांची धडक कारवाई

हायस्पीड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिममार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालवणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दिकी याच्यासह मोबाइल शॉपी मालकाला दहशतवादविरोधी पथकासह रत्नागिरी शहर पोलिसांनी अटक केली. कमी पैशात कॉलिंग करून देशाचे आर्थिक नुकसान करण्यात येते होते. या सिस्टिमचा आधार घेऊन परदेशात दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत आहे का? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अशा प्रकारची सिस्टिम रत्नागिरी शहरातील आठवडी बाजार येथे मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मास्टर माइंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दिकी याच्यासह मोबाइल शॉपी मालक अलंकार अरविंद विचारे याला न्यायालयात हजार केले असता या दोघांनाही ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रत्नागिरी शहरातून हायस्पीड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला तंत्रज्ञानाद्वारे समजले होते. त्यांनी ही माहिती रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला कळवली. यानंतर आठवडी बाजार येथील मोबाइल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवण्यासाठी आठवडी बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचे सर्व्हर बसवण्यात आले होते. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. मोबाइल शॉपी मालकाच्या नावे एका खासगी कंपनीचे हायस्पीड इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. त्यामार्फत येथील सर्व्हरवरून कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीतून सुरू होते. वाइप अॅपद्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले.

विविध कलमांंतर्गत झाला गुन्हा दाखल
या प्रकरणातील मास्टर माईंड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरून शुक्रवारी साळवी स्टाँप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलिस स्थानकात भा.दं.वि.कलम ४२०, ३४, आयटी अँक्ट ४३(ह), ६६(ड), इंडियन टेलिग्राफीक अँक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत. दरम्यान, याआधीही पोलिसांनी अनेक शहरांतून बनावट कॉलिंग सेंटरवर छापा टाकून अनेकांना अटक केली होती. याचे कनेक्शन थेट परदेशापर्यंत जाऊन पोहोचले होते.

सर्व्हर रत्नागिरीत का? याचा शोध सुरू
इंटरनॅशनल कॉलचा वापर केेेवळ परदेशात बोलण्यासाठी झाला की दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत होता याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. केवळ कॉलिंग करायचे असेल तर सर्व्हर रत्नागिरी व सेंटर मुंबईत करण्यामागील कारण काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, या टोळीने याआधी आणखी किती जणांना गंडा घातला, या तपासही पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...