आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होते राजीव सातव:मोदी लाटेत सुद्धा निवडून येणाऱ्या सातवांनी आईकडून घेतले होते राजकारणाचे धडे, राष्ट्रीय राजकारणात असूनही गावावर होते लक्ष

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • अखील भारतीय युवक काँग्रेसने सुरुवात, चारवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

हिंगोली जिल्हयात आल्यानंतर सार्वसामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना आरे बाप्या तुच सांग आता काय करू असे पिंपळदरीच्या बापुराव घोंगडे यांना बोलणारे खासदार राजीव सातव अन देशाच्या राजकारणात शांत संयमी भुमीका घेणारे खासदार राजीव सातव असे दोन्ही पैलू हिंगोलीकरांना बघितले. खासदार ॲड. सातवांच्या अकाली निधनाने सोशल मिडीयावर श्रध्दांजलीचा अक्षरशः पाऊसच पडू लागला आहे.

आईकडून मिळाले राजकारणाचे बाळकडू

कळमनुरी तालुक्यातील मसोड या ग्रामीण भागातील असलेले खासदार सातव यांचा राजकिय प्रवास देखील थक्क करणारा आहे. आई माजीमंत्री रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या खासदार सातव यांनी पंचायत समिती सदस्यापासून राजकिय प्रवास सुरु केला.
अखील भारतीय युवक काँग्रेसपासून सुरुवात
देशाच्या राष्ट्रीय राजकारणात काम करताना शांत अन संयम राखणे महत्वाचे असे त्यांनी दाखवून दिले. अखील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी देशातील तरुणांना काँग्रेसकडे वळविले अन त्यांची फळीच तयार केली. उत्तराखंड येथे झालेल्या जलप्रलयामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी मदत केली.

चारवेळा संसदरत्न पुरस्कार
राजीव सातव यांनी लोकसभेत ८१ टक्के उपस्थिती अन १०७५ प्रश्‍न विचारून त्यांनी आपल्या अभ्यासूवृत्तीची छाप त्यांनी पाडली होती. पाच वर्षाच्या काळात त्यांना चार वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. या शिवाय राज्यसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर विश्‍लेषणात्मक भाषण देखील केले होते.

2014 मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले

सन २००२ मध्ये मसोड पंचायत समिती गणातून निवडणुक लढवली. पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी खरवड जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. जिल्हा परिषदेत त्यांना कृषी सभापतीपद मिळाले. यापदावर काम करतांना त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यास त्यांनी सुरवात केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची फळी निर्माण केली. सन २००९ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभेेचे आमदार झाले. तसेच त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. हिंगोली लोससभा मतदार संघातून त्यांना सन २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले. लोकसभेत मराठवाडा व विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. सन २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली.

सातव यांनी आतापर्यंत भुषविलेली पदे

मसोड पंचायत समिती पंचायत समिती गणाचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्य, कळमनुरी विधानसभा आमदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अखील भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंगोली लोकसभेचे खासदार, राज्यसभा सदस्य, प्रभारी गुजरात काँग्रेस.

काँग्रेस निवडणुकांमध्ये सिंहाचा वाटा

सातव यांनी एनडीएमध्ये मुलींना प्रवेश द्यावा, ही अग्रही मागणी लोकसभेत मांडली होती. त्यांच्या मागणीला यशही आले होते. शिवाय, गुजरात, पंजाब या राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. यात, गुजरात विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्राची जबाबदारी अंगावर घेऊन सर्वात जास्त २८ उमेदवार विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

स्वतःच्या जिल्ह्याकडे कधीच केले नाही दुर्लक्ष
देशाच्या राजकारणात काम करताना त्यांनी आपल्या हिंगोली जिल्हयाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. हिंगोली जिल्हयात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. मात्र प्रत्येकाचे प्रश्‍न जाणून घेऊन ते मार्गी लावले जात. पिंपळदरी सारख्या आदिवासी भागातील आलेला सर्व समान्य कार्यकर्ता बापुराव घोंगडे यांना एखाद्या समस्येवर बाप्या आता तुच सांग मी काय करू असे म्हणणारे ॲड. सातव सामान्य कार्यकर्त्याशी देखील हक्काने बोलत. बाहेर राज्यात असतांना हि हिंगोलीचे नगरसेवक अनिल नेनवाणी, प्राचार्य बबन पवार यांच्याकडून ते मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेत.

शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी
कळमनुरी सारख्या मागसलेल्या तालुक्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी त्यांनी प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून शंकरराव सातव महाविद्यालय सुरु केले. या शिवाय डीएड, बीएड अभ्यासक्रम देखील सुरु केले. मागील काही दिवसांत हिंगोलीत वैद्यकिय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. त्यानुसार राज्य शासनाने हालचाली सुरु केल्या. तर कळमनुरी मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून येलकी (ता.कळमनुरी) येथे सशस्त्र सीमा बलाचे बटालीयन मंजूर करून घेतले. हे बटालीयन सुरु झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ व मृदंग वाजवून त्यांनी आंदोलन केले.

कौटुंबिक पार्श्वभूमी
राजीव सातव यांच्या आई रजनी सातव माजी मंत्री राहिल्या आहेत. आईकडूनच राजीव यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. आईशिवाय कुटुंबात पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज सातव, मुलगी युवराज्ञी सातव आहेत. राजकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही, पण कुटुंबानेही याबाबत कधीच खंत बोलून दाखवली नाही. मागील काही दिवसांपासून प्रियदर्शनी सेवासंस्थेचा कारभार डॉ. प्रज्ञा सातव पाहतात.

बातम्या आणखी आहेत...