आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र 21 पदकांसह अव्वल स्थानी:'खेलो इंडीया'त 8 सुवर्ण, योगपटूंनी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राची मान ताठ राखली - गिरीश महाजन

जबलपूर/ इंदोर/ भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र संघ खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप जिंकण्याकडे आगेकूच करीत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र संघाला तिसऱ्या दिवसअखेर गुरुवारपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक 21 पदकांची कमाई करता आली. यासह महाराष्ट्र संघ पदकतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला. महाराष्ट्राने यजमानांपेक्षा दुप्पट पदके जिंकून अव्वल स्थानी धडक मारली.

योगपटुंची दुहेरी पदसंख्या

महाराष्ट्र संघाच्या नावे 8 सुवर्णांसह 6 राैप्य आणि 7 कांस्यपदकांची नाेंद आहे. तसेच 8 सुवर्णांसह यजमान मध्य प्रदेशच्या नावे 11 पदकांची नाेंद आहे. तर या पार्श्वभूमीवर योगपटूंची दुहेरी पदकसंख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

(2 फेब्रुवारी) दिवसभरातील महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी

  • योगासन, सायकलिंगमधील भरारीने महाराष्ट्र अव्वल स्थानावर
  • योगासनात सुवर्ण, रौप्य, ब्राँझपदकांचा चौकार
  • सायकलिंगमध्ये पूजा, संज्ञाी सुवर्ण हॅटट्रिक
  • ईशा टाकसाळेला नेमबाजी रौप्य, तर स्वराज भोंडवेला ब्रॉंझपदक
  • बॅडमिंटनमध्ये नाईशा पदार्पणातच अंतिम फेरीत
  • मुष्टियुद्धात आणखी दोन पदके निश्चित
  • जिम्नॅस्टिकमध्ये आगेकूच
  • खो-खो मध्ये सुवर्णपदकापासून एक विजय दूर

योगासनात सुवर्ण चौकार
योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या योगपटूंनी देदिप्यमान यश मिळविताना सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ अशा तीनही पदकांमध्ये चौकार लगावताना एकाच दिवशी 12 पदकांची कमाई केली. सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळे, मुंबईच्या संज्ञा कोकाटे या दोघींनी सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली. टेबल टेनिसमध्ये तनिषा कोटेने अंतिम फेरी गाठत पदक निश्चित केले. जिम्नॅस्टिक, मुष्टियुद्ध, बॅडमिंटन या खेळातीलही पदके आज निश्चित झाली. नेमबाजीत ईशा टाकसाळे रौप्यपदकाची मानकरी ठरली.

योगासनात वर्चस्व

योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची कमाई केली. यामध्ये मुलींच्या 18 वर्षांखालील गटात कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखताना विजयमंचावरील पहिली तिनही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर रौप्य आणि स्वरा गुजर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पारंपरिक प्रकारात निरलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. या प्रकारात स्वरा गुजर आणि प्रांजल वहान्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या विभागात पारंपरिक प्रकारात सुमित बंडाळे सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्वराज फिस्केने ब्रॉंझपदक मिळविले. स्वराजने पारंपरिक प्रकारात हुकलेले सोनेरी यश कलात्मक प्रकारात मिळविले. निबोध पाटील या प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तालबद्ध प्रकारात दुहेरीतअंश मयेकर-नानक अभंगने रौप्य, तर रुपेश सांघे आणि सुमित बंडाळे जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

बॅडमिंटन - नाईशा पदार्पणात अंतिम फेरीत

आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 83 व्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या 14 वर्षीय नाईशा कौरने पदार्पणातच बॅडमिंटन एकेरीत मुलींच्या विभागातून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत नाईशाने उत्तर प्रदेशाच्या गार्गीचा 21-11, 21-11 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिच्यासमोर हरियानाच्या अव्वल मानांकित देविका सिहाहचे आव्हान असेल.

नेमबाजी - ईशाला रौप्य

नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल प्रकारात पहिल्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठणाऱ्या ईशा टांकसाळेला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत ईशाला मध्य प्रदेशाच्या गौतमी भानोतकडून 14-16 असा दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. मुलांच्या 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात महाराष्ट्राचा स्वराज भोंडवे 18 गुणांसह ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

सायकिलंग - पूजा, संज्ञाचे सोनेरी यश कायम

सायकलिंगमध्ये महाराष्ट्र संघातील कोल्हापूरच्या पूजा दानोळे आणि मुंबईच्या संज्ञा कोकाटे यांनी आपले खेलो इंडियातील सुवर्ण यश कायम राखले. पुरेसा आंतरराष्ट्रीय अनुभव गाठिशी असणाऱ्या पूजाने मुलींच्या स्क्रॅच प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात मुलांमध्ये ओम कारंडे ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. टाईम ट्रायल प्रकारात संज्ञाने सोनेरी यश मिळविले. तिने या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व राखले. पूजा, संज्ञाने आदिती डोंगरेच्यासाथीत सांघिक स्प्रिंट प्रकारातही सुवर्णपदक मिळवून पहिल्या दिवशी दिल्लीतल्या वेलोड्रमवर महाराष्ट्राचा झेंडा फडकावला. पूजा आणि संज्ञाचा सोनेरी यशाचा वेग भन्नाट होता. पूजाने प्रति 36.87 कि.मी. वेगाने 12 मिनिट 12 सेकंदात शर्यत जिंकली. संज्ञाने 46.85 प्रति कि.मी. वेगाने सायकलिंग करताना 38.424 सेकंदात शर्यत जिंकली. पूजा, संज्ञाने आदितीच्या साथीत सांघिक टाइट ट्रायल शर्यत जिंकताना 47.34 प्रति कि.मी. वेग राखताना 57.034 सेकंदात सुवर्णपदक मिळविले.

खो-खो - सुवर्णपासून एक सामना दूर

खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघ सुवर्णपदकापासून एक सामना दूर आहे. उपांत्य फेरीत मुलींनी प्रिती काळे,. अश्विनी शिंदे, दिपाली राठोड यांच्या तुफानी खेळाने कर्नाटकाचे आव्हान 1 डाव एका गुणाने परतवून लावले. मुलांनी ओडिशाचे आव्हान 1 डाव 6 गुणांनी परतवून लावले. अंतिम फेरीत मुलांची गाठ दिल्ली, तर मुलींची ओडिशाशी पडणार आहे.

योगापटूंची कामगिरी उत्साहवर्धक - गिरीश महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत योगापटूंच्या यशाचा सर्वांत मोठा वाटा होता. त्याचीच परिणती खेलो इंडिया युवा स्पर्धेत आली. येथेही योगपटूंनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ राखली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौथ्या पर्वाची आता कुठे सुरुवात झाली आहे. योगपटूंची ही दुहेरी पदकसंख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राची आगेकूच प्रेरणादायी - सुहास दिवसे

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या विजयी मोहिमेस जबरदस्त सुरुवात केली आहे. योगा आणि सायकलपटूंनी आज कमाल केली. त्यांना सरावासाठी मिळत असलेल्या सुविधा, चांगले प्रशिक्षण याचे हे फळ आहे. निश्चितच भविष्यात महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात आपली हुकुमत राखेल. या स्पर्धेची ही सुरुवात आशादायी, प्रेरक आणि पुन्हा एकदा विजेतेपदाकडे घेऊन जाणारी आहे, अशी भावना क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

---

महाराष्ट्र - आजचे पदकाचे मानकरी

नेमबाजी

  • इशा टाकसाळे (राैप्य)
  • स्वराज भाेंडवे (कांस्य)

सायकलिंग

  • पूजा दानोळे (सुवर्ण),
  • संज्ञा कोकाटे(सुवर्ण),
  • ओम कारंडे (कांस्य)

टीम स्प्रिंट - मुली (सुवर्ण)

  • अदिती डोंगरे , पूजा दानोळे, संज्ञा कोकाटे

याेगासन

  • रुद्राक्षी भावे (सुवर्ण),
  • निरल वाडेकर (राैप्य),
  • स्वरा गुजर (कांस्य)
  • तृप्ती डाेंगरे-देवांशी वाकळे (सुवर्ण),
  • स्वरा गुजर-प्रांजल वहान्न (राैप्य),
  • सुमित बंडाळे (सुवर्ण)
  • स्वराज फिस्के (कांस्य)
  • स्वराज फिस्के (सुवर्ण)
  • निबाेध पाटील (कांस्य)
  • अंश मयेकर-नानक अभंग (राैप्य),
  • रुपेश सांघे-सुमीत बंडाळे (कांस्य)
बातम्या आणखी आहेत...