आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Goa Assembly Election | Shiv Sena's Punch Not Even Elected In Goa, Aam Aadmi Party In The State On Political Tourism: CM Dr. Sawant

गोवा विधानसभा:शिवसेनेचा गोव्यात पंचही निवडून आला नाही, आम आदमी पार्टी राज्यात पॉलिटिकल टुरिझमवर : सीएम डॉ. सावंत

नितीश गोवंडे । पणजी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या फेब्रुवारी २०२२ मध्ये गोव्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी असे सात पक्ष ४० जागांसाठी निवडणूक लढवणार आहेत.

या वेळी भाजपने असा दावा केला की, ममता बॅनर्जी आल्या काय अथवा अरविंद केजरीवाल आले काय, गोव्याची जनता सुज्ञ आहे. गोव्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार. यासाठी भाजपने कंबर कसली असून एकहाती पूर्णपणे बहुमत मिळवण्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक आश्वासनांची पूर्तता केल्याचे सांगत पुढेही गोवा आणखी समृद्ध करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

नेमकी लढाई कोणासोबत ?

या वेळी बघितले तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळे पक्ष असे चित्र आहे. सध्या तरी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी विरोधात आहेतच.

निवडणूक भाजपच जिंकणार असे कशावरून वाटते ?

जी विकासाची कामे डबल इंजिन सरकारने (केंद्र आणि राज्य) केली आहेत त्या कामावरती आम्ही नक्कीच ही लढाई जिंकू. कोरोना महामारी, तौक्ते वादळ यामध्ये मी केलेले काम नागरिकांनी बघितले आहे. आम्ही या काळात केलेले आर्थिक नियोजन देखील नागरिकांनी बघितले आहे. त्यामुळे निश्चितच लोक माझ्या सरकारवरती विश्वास ठेवतील याची मला खात्री आहे.

आज गोवा हे कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पहिले राज्य ठरले आहे त्याबाबत काय सांगाल ?

त्याचे श्रेय सगळे आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना जाते. त्यांनी पहिला डोस राज्यभरात पूर्ण केलाच याशिवाय दुसऱ्या डोससाठी आमची आरोग्य विभागाची संपूर्ण टीमही चांगल्या कामानिशी लागलेली आहे. ९० टक्क्यांपर्यंत दोन्ही डोस गोव्यात पूर्ण झालेले आहेत. इथे बाहेरून आलेल्या नागरिकांदेखील मोफत कोरोना डोस आम्ही आधीपासून देत आहोत.

कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्यांना पहिल्यांदा तुम्ही आर्थिक मदत जाहीर केली होती ?

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी केंद्राने सरसकट ५० हजार रुपयांची मदत केली आहे. आम्ही मात्र, या काळात आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातून त्यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून दोन लाख रुपये देत आहोत.

तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी काय तयारी तुम्ही केली आहे ?

१०० टक्के लसीकरण हा एक त्यावरचा मुख्य उपाय आहे. त्यामुळे सगळ्यांनीच लस घेणे गरजेचे आहे. तसेच आपले वैज्ञानिक आणि डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे लाट येणार नाही याची खात्री आहे. तरी कोरोना नियमांचे पालन लोकांनी करावे. लोकांनी त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. तिसरी लाट येऊच नये असा आमचा प्रयत्न आहे, तरी आलीच तर सरकार सज्ज आहेच पण लोक देखील सज्ज असणे गरजेचे आहे.

लोकसंख्येचा विचार करता गोव्यात बेरोजगारी अधिक आहे ? मायनिंग बंद असल्याचा फटका बसतो आहे का ?

मायनिंग हे बेरोजगारीचे एक मुख्य कारण आहेच पण कोरोना देखील महत्त्वाचे कारण आहे. त्या काळात टुरिझम बंद असल्याने मोठा फटका लोकांना सहन करावा लागला. अनेक लहान-मोठे उद्योग बंद झाले. नुकतेच आम्ही एक हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीप्रमाणे गोव्यातदेखील वीज मोफत देऊ असे सांगितले आहे ? तुम्ही १६ हजार लिटर पाणी मोफत देत आहात ?

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना इथे मोफत वीज देऊ असे सांगायला काहीच लागत नाही, कारण त्यांना माहिती आहे की इथे त्यांचे राज्य येणार नाही. त्यामुळे इथे कितीही खोटी आश्वासने दिली तरी ती खपून जातील माझे राज्य आले नाही म्हणून सांगायला.

म्हणूनच ते वारंवार दिल्लीहून इथे लोक पाठवतात. ते पॉलिटिकल टुरिझम आहे. अतिथी देवो भव ह्या आमच्या संस्कृतीनुसार आम्ही त्यांचे स्वागत करतो. १६ हजार लिटर पाणी मोफत देत असताना फ्री वॉटर टू सेव्ह वॉटर असे नियोजन केले आहे. आम्ही पाणी बचत करायचे आणि ते लोकांना मोफत द्यायचे असा हा उपक्रम आहे.

बातम्या आणखी आहेत...