आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Grampanchayat Election 2021 Result : BJP Aghadi Says, 'Victory Is Ours'; Shiv Sena And NCP Have No Claim; MNS, Ripai, You Also Opened An Account

ग्रामपंचायत निकाल:भाजप-आघाडी म्हणतात, ‘सरशी आमचीच’; शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा दावाच नाही; मनसे, रिपाइं, आपनेही उघडले खाते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्गात भरघोस यश मिळाल्यानंतर जल्लोष करताना आमदार नितेश राणे - Divya Marathi
सिंधुदुर्गात भरघोस यश मिळाल्यानंतर जल्लोष करताना आमदार नितेश राणे
  • 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर मुंडेंचे वर्चस्व, नांदेडमध्ये चव्हाणांना धक्का

राज्यात ११ हजार ८०४ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी सायंकाळी हाती आले. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३२ ग्रामपंचायती भाजपने पटकावल्या असून भाजप राज्यात सर्वात मोठा बनल्याचा दावा पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची राज्यात सरशी झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

१५ जानेवारी रोजी राज्यातील १२, ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. सायंकाळच्या प्राप्त माहितीनुसार भाजपने २६३२, शिवसेनेने २५७६, राष्ट्रवादीने २४००, काँग्रेसने १८२३, मनसेने ३६, स्थानिक आघाड्यांनी २३३७ ग्रामपंचायतींत बहुमत मिळवले होते. आम आदमी पक्षाचे १८ सदस्य निवडून आल्याचे राज्य समन्वयक प्रीती मेनन यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे ६ हजार ग्रामपंचायतीत सरपंच होतील, असा दावा केला. तसेच ज्या १६६५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्यातील ६५ ग्रामपंचायती भाजपच्या आहेत, असे पाटील यांनी नमूद केले. ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवले असून काँग्रेस राज्यात क्रमांक १ चा पक्ष म्हणून समोर आला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. १०० ग्रामपंचायतीत बहुमत मिळवल्याने रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी सांगतिले. आम आदमी पक्षाचे १८ सदस्य जिंकले आहेत. लातूर ५, नागपूर ६, सोलापूर ३, चंद्रपूर २, नाशिक १ आणि गोंदियात १ जागा जिंकल्याचे आपने दावा केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मात्र कोणताही दावा केला नाही. आम्ही माहिती संकलित करत आहोत, असे शिवसेनेच्या प्रवक्त्याने सांगितले.

दरम्यान, अहमदनगरमध्ये ७०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालाने भल्याभल्यांना धक्के बसले. राळेगण सिद्धीमध्ये बंड फसले. ग्रामविकास पॅनलच्या ताब्यात सत्ता राहिली. बिनविरोधला विरोध करत स्थापन झालेल्या शामबाबा पॅनेलचा पराभव झाला.राहाता तालुक्यातील २५ पैकी २४ ग्रामपंचायती भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या ताब्यात आल्या. नेवासे तालुक्यात सोनई ग्रामपंचायतीत १३ जागा जिंकत मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम राहिले. संगमनेर तालुक्यातील कणकवली ग्रामपंचायतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना धक्का बसला.

मराठवाडा : कुठे दिग्गजांचा विजय, तर कुठे धक्कातंत्र

मराठवाड्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुठे दिग्गजांनी वर्चस्व कायम राखले, तर अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला. परळी आणि अंबाजोगाई मिळून १२ ग्रामपंचायतींपैकी १० ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व दिसून आले. नांदेडमध्ये मात्र काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळाले असले तरी काही ठिकाणी मात्र मित्रपक्ष शिवसेना व विरोधी पक्ष भाजप पुरस्कृत उमेदवारांनी धक्का दिला.

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील पिशाेर ग्रामपंचायतीत हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव आदित्यवर्धन जाधव यांच्या पॅनलला पाच, तर संजना जाधव यांच्या पॅनलला दाेन जागांवर समाधान मानावे लागले. तर, नागद ग्रामपंचायतीवर माजी अामदार नितीन पाटलांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले. पैठण तालुक्यातील पाचोड गावात राेहयाे मंत्री संदिपान भुमरे यांच्या पॅनलने वर्चस्व कायम राखले. नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या भोकर, अर्धापूर, मुदखेडमध्ये काँग्रेसच वर्चस्व असले तरी बारड, पांडुरनी, दिवसी, रायकोट, बारसगाव येथे शिवसेना, तर पांलुरना, हसापूर, जामदारी, लगूद, नांदा येथे भाजपला यश मिळाले. उस्मानाबादमध्ये शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे गाव असलेल्या गोवर्धनवाडी ग्रामपंचायतीसह त्यांचे आजोळ असलेल्या जागजी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.

जालन्यात बदनापूर भोकरदन, जाफराबाद, परतूर या तालुक्यांमध्ये भाजपने तर अंबड आणि घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. परभणी, हिंगोली जिल्ह्यात भाजप व महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाले. हिंगोलीतील बळसोंड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या सर्वच्या सर्व १३ उमेदवार पराभूत झाले आहेत.

बीडमध्ये मुंडे, क्षीरसागर, धस, पंडितांचे वर्चस्व कायम

परळी व अंबाजोगाई तालुक्यात एकूण १२ पैकी १० ग्रामपंचायतींवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. बीड मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने २९ पैकी २१ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. तर दुसरीकडे आमदार पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या गटाने बीड मतदारसंघात २९ पैकी १८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचा दावा केला. गेवराईत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गढीमध्ये ११ पैकी ११ जागा जिंकल्या. पाटोदा तालुक्यातील नऊपैकी बहुतांश ग्रामपंचायती आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आल्या आहेत.

विदर्भ : नागपुरात ७३ जागांवर भाजपने मिळवला विजय

ग्रामपंचायत निवडणूक निकालात सर्वपक्षीय नेत्यांना आपापले गड राखण्यात यश आले. तर निवडणूक पक्ष चिन्हावर नसल्यामुळे सर्वपक्षीयांनी जिंकलेल्या उमेदवारांवर दावे केले. यामुळे कोणाचे नक्की किती उमेदवार निवडून आले हे शेवटपर्यंत कळू शकले नाही.

नागपुरातील कोराडी ग्रा.पं. निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखले. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे मूळ गाव असलेले पाटणसावंगी ग्रामपंचायत जिंकली आहे. नागपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांचा उमरेड मतदारसंघ राखला. नागपुरात एकूण ७३ ग्राम पंचायतींवर भाजपने विजय मिळवला. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने मात्र त्यांचा पक्ष हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. पालकमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील त्यांच्या मोझरी गावची सत्ता अबाधित राखली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व खा. प्रतापराव जाधव यांना आपला गड राखता आला. वंचित बहुजन आघाडीनेही जागा वाढवण्यात यश मिळवले आहे.

वर्ध्यात तीन आमदार व एक खासदार असूनही ग्रामीण भागात भाजप या निवडणुकीत हद्दपार झाल्याचे चित्र निवडणूक निकालाच्या वेळी दिसून आले. यवतमाळमध्ये माजी मंत्री माणिकराव ठाकरेंच्या दारव्हा तालुक्यातील हरु गावात त्यांचे पूर्ण पॅनल विजयी झाले. चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ पैकी ३३९ ग्राम पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचे भाजपने जाहीर केले आहे. तर वर्धा जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता आल्याचा दावा करण्यात आला. भंडाऱ्यात १४८ पैकी ९५ ग्रापंमध्ये भाजप आली, तर काँग्रेसला ५३ जागा मिळाल्याचे सांगण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातही १८१ पैकी ९५ ग्रापंमध्ये भाजपला यश मिळाले. आघाडीला ७८ जागा मिळाल्या. गडचिरोलीत २ टप्प्यात मतदान आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० जानेवारीला आहे.

सातारा : सर्वच विद्यमान आमदार गड शाबूत राखण्यात यशस्वी

सातारा |ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालात बहुतांश विधानसभा मतदारसंघांतील आमदारांनी आपापले गड राखण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले आहे. काही ठिकाणी मात्र धक्कादायक निकाल लागले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतलेल्या कोंडवे गावात तेरापैकी तीन जागांवर त्यांच्या गटाला समाधान मानावे लागले आहे. फलटण, वाई, खंडाळा, कराड उत्तर, कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसलेे. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण व दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर गटांना एकत्रित आल्याचा फायदा झाला.

सोलापूर : अकलूजला ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती

सोलापूर | ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बहुतांश गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक आजी-माजी आमदारांचे गट स्थानिक पातळीवर एकत्र आल्याने पक्षीय दाव्यालाच छेद बसला आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकीच्या चुरशीत मात्र विजयसिंह मोहिते पाटील गटाचे मुख्य उमेदवार संग्रामसिंह मोहिते यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी विरोधी स्व. प्रतापसिंह मोहिते गटाचे गिरिराज माने देशमुख यांचा विजय झाला आहे. त्यामुळे येथे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली.

सांगली : बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा धुव्वा, राष्ट्रवादीची बाजी

सांगली | काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर बाजी मारली असली तरी भारतीय जनता पक्षानेही मिरज, तासगाव तालुक्यात निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे. तसेच खानापूर तालुक्यात शिवसेनेने विजय प्राप्त केला आहे. शिवसेनेनेही जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींवर कब्जा करीत प्रथमच मुसंडी मारली आहे. तासगाव, मिरज या दोन मतदारसंघांत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने कब्जा मिळवला आहे.

पुणे : राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, काही ठिकाणी सोडचिठ्ठीने निकाल

पुणे| पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींपैकी ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्याने उर्वरित ६४९ ग्रामपंचायतींमध्ये हाती आलेल्या निकालांमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर ग्रामपंचायतीच्या मतमोजणीदरम्यान तीन गावांतील उमेदवारांना समान मते पडली. त्यामुळे काही वेळ सगळ्यांचेच लक्ष या दिवळे, वेळू आणि जांभळी गावच्या निकालाकडे लागले. अखेर लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून निकालाची घोषणा करण्यात आली.

कोल्हापूर : स्थानिक आघाड्यांकडेच सत्ता

कोल्हापूर| जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघड्यांचीच सत्ता सिद्ध झाली आहे. मतमोजणी निकालानंतर हे चित्र समोर आले. राज्याचे लक्ष लागलेल्या खानापूर ग्रामपंचायतीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार दणका दिला. हातकणंगले, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळ्यात स्थानिक आघाडी, कागलमध्ये महाविकास आघाडी तर गगनबावड्यात काँग्रेसची सरशी झाली आहे. आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २३ ग्रामपंचायतींवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जनतेने साथ दिली.

कोकण : रायगड-रत्नागिरीत सेना, सिंधुदुर्गात भाजप वरचढ

रायगड | कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना तर सिंधुदुर्गात भाजपने वर्चस्व मिळवले आहे. रायगड जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निकालात शिवसेनेने जिल्ह्याच्या २० ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. महाविकास आघाडीनेही १९ ग्रामपंचायतींवर आपली सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. शेकापला अलिबाग आणि पेणमध्ये ९ ठिकाणी सत्ता राखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात भाजपच्या १२ ग्रामपंचायती आल्या आहेत. स्थानिक गावविकास आघाडी ६ तर तीन ग्रामपंचायतींवर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला पनवेल सोडता इतर तालुक्यांत आपले कमळ फुलवता आलेले नाही. काँग्रेस पक्षालाही एकाही ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवता आलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपकडे ४५ तर सेनेकडे २१ ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने १ आणि गाव पॅनलने ३ ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...