आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोरोना'ची गावकथा:तासगावात केवळ एका व्यक्तीने घेतली लस, रुग्णालयात अवयव काढून घेत असल्याची अफवा, आदिवासींसाठी काढा हाच उपचार

तासगाव, रायगड (मंगेश फल्ले, मनोज व्हटकर)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावात विवाह समारंभ, बारसे आणि सार्वजनिक कार्यक्रमांचा धूमधडाका
  • कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून लग्नांचा धडाका

लस घेतल्यानंतर आजार होतो, विनाकारण त्रास कशाला असे म्हणत अख्ख्या गावानेच लसीकडे पाठ फिरवली. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रुग्णालयात अवयव काढले जातात, अशी या आदिवासीत अफवा पसरली आहे. २७५ लोकवस्तीच्या गावात फक्त एकानेच लस घेतली. खरे तर कोरोना आजारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे गावकरी वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसली तर काढा पिणे हाच त्यांचा उपचार.

रायगड जिल्ह्यातील तासगाव (ता. माणगाव)ही आदिवासी लोकांची मोठी वस्ती. बागड ग्रामपंचायतअंतर्गत ही तासगाव वस्ती आहे. अलिबागपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावरील हे गाव. गुरुवारी ‘दिव्य मराठी’ टीम या गावात पोहोचली. गावामध्ये लग्नाचे २ मंडप दिसले. एका मंडपात भोजनाची तयारी सुरू होती. नवरदेवाला हळद लागलेली. कोणालाही कोरोनाची भीती नव्हती. या लग्नाला शंभर-दीडशे लोक येतील, असा गावकऱ्यांचा अंदाज होता.

काढा हाच कोरोनावरील उपचार: ताप खोकला सर्दी अशी काही लक्षणे दिसली की गावकरी स्वत:च काढा तयार करून पितात. हा काढा अडुळसा, तुळशी, पार्वती झाडाचा पाला यापासून तयार केला जातो. कोणीही दवाखान्यात जात नाहीत. आज गावात कोरोना बाधितांची संख्या नसली दुर्लक्षामुळे पुढे हा आजार बळावू शकतो, अशी शक्यता नथुराम शंकर वाघमारे यांनी वर्तवली.

गंभीर रुग्णांना ७० किलोमीटर दूर न्यावे लागते : गावात कोणी आजारी पडले तर त्याला जवळपास १५ ते ४० किलोमीटरवरील खासगी दवाखान्यात न्यावे लागते. सात किलोमीटरवरील शिरवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण तिथे व्हेंटिलेटर अथवा ऑक्सिजनची सुविधा नाही. गंभीर रुग्णांना ७० कि.मी.वरील अलिबागला जावे लागते.

डॉक्टरही म्हणाले, काढा गुणकारी
या परिसरातील डॉक्टर नितीन मोदी यांनी सांगितले की, गावाच्या परिसरात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप झाले आहे. गावामध्ये कोरोना नसला तरी गावातील प्रत्येक घरातील एक तरी चाकरमानी मुंबईत आहे. या गावातील चौदा, पंधरा जण मुंबईत बाधित आहेत. माझ्याकडे ४० ते ४५ गावांतील रुग्ण येतात. गुळवेल काढा सर्दी, खोकला, ताप यावर परिणामकारक असल्यामुळे झाडाच्या फांद्या घेऊन त्यात लवंग, हळद टाकून तसेच अद्रक, कापूर, हळद टाकून काढा तयार करून दिला जातो.

आदिवासी भागात जागृतीची गरज
गावातील लोक मेहनती आहेत. त्यामुळे कोणताच आजार होत नाही, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे कोरोनाला ते मानत नाहीत की लस घेत नाहीत. गावठी उपचार करतात. या आदिवासी भागामध्ये जनजागृतीची गरज आहे, असे येथील चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले.

एकाच कंपनीवर गावकऱ्यांची रोजीरोटी
गावापासून दोन किलोमीटरवर पास्को ही लोखंडापासून वस्तू बनवण्याची कंपनी आहे. यात गावातील प्रत्येक घरातील एक, दोन व्यक्ती कामाला आहे. त्यावर या गावातील सर्वांची रोजीरोटी चालते. काही गावकऱ्यांनी कोंबडी पालन, बकरी पालन व्यवसाय सुरू केला आहे.

पाच किलोमीटरवरील गाव सील
तासगावपासून ५ कि. मी. वरील विळे ग्रामपंचायतीने सोळा बाधित रुग्ण सापडल्यामुळे पूर्ण गाव सील केले आहे. आता २८ दिवसांनंतर हे गाव या निर्बंधातून मोकळे होईल. जवळच असलेले विळेचिरावाडी हे गावही नुकतेच निर्बंधातून मुक्त झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...