आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहज यात्रा २०२२ साठी मुदतीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी अर्ज प्राप्त झाले. यामुळे अर्ज दाखल करण्यास पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. आता भाविकांना १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील २१ विमानतळांऐवजी केवळ १० विमानतळावरून भाविकांना हज यात्रेला जाता येईल. तसेच कोवीशिल्डचे दोन्ही डोस देखील सौदी अरेबिया सरकारने सक्तीचे केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या हज यात्रेसाठी यंदा मुभा देण्यात आली. भारतातून १ लाख ४० हजार भाविकांना हजची संधी यंदा मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत होती. मात्र, या मुदतीत केवळ ६८ हजार अर्ज हज कमिटीकडे प्राप्त झाले. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवून १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली. हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकूब शेख यांनी ही मुदतवाढ जाहीर केली.
दरम्यान, यंदाची हज यात्रा पूर्णपणे डिजिटल झाली आहे. भाविक हजयात्रा नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने तसेच मोबाईल अॅपद्वारे करू शकतील. दरम्यान, हज यात्रेसाठी अर्ज दाखल करताना व हज यात्रेनिमित्त सौदी अरेबियात जाताना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस बंधनकारक आहे.
२१ ऐवजी १० ठिकाणांवरून उड्डाण
हज यात्रेसाठी भारतातून पूर्वी २१ विमानतळावरून उड्डाण होत होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० विमानतळावरून हजयात्री रवाना होतील. अहमदाबाद, बेंगळुरू, कोचिन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि श्रीनगर अशी ही विमानतळे आहेत. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण-दिव आणि दादरा नगरहवेली या भागातील यात्रेकरू मुंबईतून प्रवास करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.