आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मिशन बिगीन अगेन:'जिम,शॉपिंग मॉलबाबत विचार सुरू, लोकल ट्रेनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील'- राजेश टोपे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो

राज्यात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरू करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

पत्रकार परिषदेत टोपेंनी सांगितले की, महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरू केल्या जातील. पुन्हा व्यायामशाळा आणि शॉपिंग मॉल सुरू करावेत का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहेत. जिम ही जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेची आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल.

पुण्यातही मिशन झीरो प्रकल्प राबवण्यात येणार

मुंबईतील करोनाग्रस्तांचा दर आटोक्यात येत असतानाच पुण्यात आता अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत राबवलेल्या मिशन झीरो प्रकल्पामुळे रुग्णसंख्येत घट झाली. त्यामुळे पुण्यातही मिशन झीरो प्रकल्प राबवणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

'देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याचे स्वागत'

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना चाचणीवरुन राज्य सरकारवर आरोप केले होते. याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्याचे स्वागत करतो. आम्ही टेस्टिंग लॅबची संख्या वाढवत आहोत. तसेच अँटिजेन टेस्टही प्रत्येक जिल्ह्यात वाढवत आहोत. विरोधी पक्षाने त्यांचं काम करावे, त्यात राजकारण नको. चांगल्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो. त्यावर कामही केले जाईल. महाराष्ट्राने टेस्ट वाढवल्या आहेत. त्यामुळे राज्यातून खरे आकडे समोर येत आहेत.'