आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जण वाहून गेला:दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस; कोकणात तीन जिल्ह्यांत पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांना पूर; सतर्क राहण्याचे निर्देश

रायगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावंतवाडीची तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गात अनेक भागात पूर आला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये पुराचे पाणी शहरात शिरले होते. दरम्यान, नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला. या पुराच्या पाण्यात राजापुरात एक जण वाहून गेला. बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा पुराचे पाणी शहरात शिरले होते. या पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकासह शिवाजी पथ, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ, कोंढेतड परिसर पाण्याखाली गेला आहे. राजापूर हर्डी रानतळे मार्गावर यावर्षीही रस्ता खचला असून या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यात शिवणे बुद्रुक येथे रस्त्यावर दगड व माती आल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते. खारेपाटण येथील सुख नदीला पूर आल्याने खारेपाटणच्या सखल भागात पाणी शिरले होते. खारेपाटण बाजारपेठही पाण्याखाली गेली होती. तालुक्यातील गड नदी आणि जाणवली नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. यामुळे या नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवली-आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे.

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट
रायगड जिल्ह्यात रायगडात रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. खोपोली तसेच पुन्हा एकदा मुरूडमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. खोपोलीत काजूवाडीच्या टेकडीचा काही भाग महामार्गावर कोसळला. दुसरी घटना मुरूडमध्ये घडली. सध्या मुरूडकडे येण्यासाठी एकमेव असलेल्या भालगाव मार्गावरील सावली आणि मिठागरदरम्यान दरड कोसळली. त्यामुळे हाही मार्ग बंद झाला. याआधी पूल कोसळल्याने काशीदमार्गे येण्यासाठी रस्ता बंद आहे. केळघर मार्गही दरड कोसळल्याने बंद आहे तसेच उसरोली नदी जलमय झाल्याने तोही मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

सावंतवाडीची तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर
सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातील आळवाडी-मच्छी मार्केट बाजारपेठेत घुसले. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे. शहरातील निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक २६ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...