आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मुसळधार पावसाने चिंचोर्डी शिवारात नद्या-नाल्यांना पूर; सहा वर्षांची मुलगी पुराच्या पाण्यात बेपत्ता, चौघे जण बचावले

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात पुराच्या पाण्यात सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संध्या आकाश तागडे (६, रा. करोडी, ता. हदगाव) असे या मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोडी येथील संध्या तागडे ही मुलगी चिंचोर्डी येथे तिचे आजोबा भारत संतोबा पाईकराव यांच्याकडे आली होती. आज सकाळी सध्या तिचे आजोबा भारत पाईकराव यांच्यासह, जयाबाई पाईकराव, पांडूरंग तुळशीराम पाईकराव, यशोदाबाई पाईकराव यांच्यासोबत शेतात गेली होती. दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे साडेचार वाजता हे सर्व घरी येण्यासाठी निघाले.

मात्र चिंचोर्डी शिवारात असलेल्या ओढ्याला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहू लागले होते. या पाण्यातून सहज बाहेर निघत असे गृहीत धरून ते सर्व जण पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून गावाकडे येत होते. मात्र यावेळी पाण्याचा वेग जास्त असल्याने संध्याचा हात सुटला अन् ती पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली. तर इतर चौघे जण पुराच्या पाण्यातून कसेबसे बाहेर निघाले. त्यानंतर हा प्रकार गावकरी व कळमनुरी पोलिसांना कळविला. त्यानुसार गावकरी भारत कुरुडे, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार शामराव गुहाडे, प्रशांत शिंदे, सुनील रिठ्ठे, शशीकांत भिसे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांनी ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या येलकी, धावंडा या गावातील पोलिस पाटील व गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्या ठिकाणी मुलीचा शोध घेण्याबाबत कळविले. तर पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला आहे. मात्र ओढ्याच्या पुराचे पाणी कायम असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्हयात आज दुपारपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असून या पावसामुळे ओढे व नाले भरून वाहू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...