आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहर:लोहा, पालम तालुक्यात जोरदार पाऊस; दोन महिला गेल्या वाहून, नांदेड-परभणी जिल्ह्यांत नुकसान

नांदेड/परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : लोहा तालुक्यात नसरत सावरगाव येथे जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. - Divya Marathi
नांदेड : लोहा तालुक्यात नसरत सावरगाव येथे जोरदार पावसामुळे नदीला पूर आला.

नांदेड जिल्ह्यात लोहा व परभणीतील पालम तालुक्यात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नांदेडच्या इतर तालुक्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस झाला. लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला. या वेळी गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला. पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली आणि दाेन महिला वाहून गेल्या. त्या सख्ख्या जावा असून मणकर्णाबाई बापूराव दगडगावे (५२) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे (४५) अशी मृतांची नावे आहेत.

लोहा तालुक्यातील मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगाव, चितळी, मुरंबी, सावरगाव आदी गावांत ढगफुटीसारखा पाऊस झाला. नसरत सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. पावसाचे पाणी वाढल्यामुळे ते बैलगाडीसह घराकडे येत होते. रस्त्यावर नदी आहे. नदी ओलांडून येताना अचानक नदीला पुराच्या पाण्याचा लोट आला आणि बैलगाडी वाहून गेली. गाडीमध्ये अमोल, भाऊ विवेक, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापूराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाच जण होते. त्यातील मणकर्णाबाई यांचा हुलेवाडी येथील पुलाजवळ तर पार्वतीबाई यांचा परभणी जिल्ह्यातील पेंडू (ता.पालम) येथे मृतदेह सापडला. अमोल, विवेक, शिवमाला यांनी झाडाच्या फांदीला धरून आपला जीव वाचवला. तसेच बैलजोडीही वाहून गेली असून त्यांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.

दरम्यान, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर, अर्धापूर आदी तालुक्यांत मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पाऊस पडत होता.

परभणी : वाहून जाणाऱ्या दोघांचे वाचले प्राण, पालमला टॉवरवर कोसळली वीज
जिल्ह्यात पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास परत कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. यात गंगाखेड, पालम तालुक्यात दुपारच्या सुमारास पावसाने दोन ते तीन तास जोरदार हजेरी लावली. पालम येथे लेंडी नदीला पूर आला. शहरापासून जवळ असलेल्या शेतकरी सुरेश शेंगुळे यांच्या शेतातील सालगडी अंगद शिरस्कर व नारायण शेगुळे हे दोघेजण बैलगाडीत बसून गावाकडे येत असताना बैलगाडीसह वाहून जात होते. पण त्या दोघांनी कसाबसा जीव वाचवला. बैल मात्र दगावले. तर पालम पोलीस ठाणे येथील वायरलेस टॉवरवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.

जिल्ह्यात तीन महिन्यांत ८४.४८ टक्के पाऊस
नांदेड जिल्ह्यात आज ६३९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असून प्रत्यक्षात ७५३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८९१.३० टक्के इतकी असून प्रत्यक्षात यंदा तीन महिन्यांतच ८४.४८ टक्के इतका पाऊस झाला. सरासरी गाठण्यास केवळ १७ टक्के बाकी असून वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...