आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फोटोमागचे सत्य:नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाचे सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या दोन फोटोतील हे आहे सत्य

रायगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार (दि. 7) फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन झाले आणि उदघाटनाच्या या फोटोसोबत गेले दोन दिवस सोशल मीडियात याच कॉलेजच्या उदघाटनाचा आणखीन एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. 2018 मधील हा फोटो आहे. काय सत्य आहे या फोटो मागील असा प्रश्न सध्या सर्वानाच पडलेला दिसतोय.

एक फोटो आहे अमित शाह यांना नारायण राणे हार घालतानाचा

7 फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचा एक फोटो या दुसऱ्या फोटोसोबत आहे. या फोटोत अमित शाह यांच्या सोबत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण दिसत आहेत.

दुसरा फोटो आहे 2018 सालातला

या फोटोत नारायण राणे यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत. राणेंचे स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित आहेत.

फोटोतील बॅनरवरचा मजकूर ठरतोय लक्षवेधी

या दोन्ही फोटोतील बॅनरवरचा मजकूर सध्या लक्षवेधी ठरतोय. पहिल्या फोटोतील बॅनरवर "लाइफईम मेडिकल कॉलेज उदघाटन सोहळा" असा मजकूर आहे. तर दुसऱ्या फोटोतील बॅनरवर "लाइफईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय भव्य उदघाटन सोहळा" असा मजकूर दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियातील बातम्यांमध्ये नारायण राणे यांनी आपल्याच पक्षाच्या गृहमंत्री अमित शाह यांची फसवणूक केली. एकाच मेडिकल कॉलेजचे दोन वेळा उदघाटन केले अशा बातम्या येत आहेत.

नेमकं सत्य काय आहे

सण 2018 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेव्हा उदघाटन झाले होते तेव्हा राणेंच्या मेडिकल कॉलेजची इमारत बांधून पूर्ण झाली होती. या कॉलेजला मेडीकल कौन्सिल ऑफ इंडीयाचे परवानगी मिळाली नव्हती. मात्र हॉस्पिटल प्रत्यक्षात सुरु झाले होते. बॅनरवर "लाइफईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय भव्य उदघाटन सोहळा" असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात हॉस्पिटलचे उदघाटन झाले होते. मात्र जानेवारी 2020 मध्ये राणेंच्या एसएसपीएम संस्थेच्या मेडिकल कॉलेजला मेडीकल कौन्सिल ऑफ इंडीयाचे परवानगी पत्र मिळाले. यानंतर या कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली. 150 विद्यार्थ्यांचा पूर्ण कोठा भरून झाला. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आणि कॉलेजचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी रीतसर उदघाटन झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...