आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पालिकेत व्हॉटस्‌अपवरूनही भरता येणार कर, व्हॉटस्‌अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसीत करणारी राज्यातील पहिली नगर पालिका

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेने आता नागरीकांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध केली असून अगदी घरबसल्या पालिकेचा कर व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्यासाठी पालिकेने व्हॉटस्‌अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसीत केली आहे. त्यामुळे सर्व कर याद्वारे भरता येणार असून विशेष म्हणजे तातडीने कर भरल्याच्या रकमेची ग्राहकाच्या नावे पावती देखील मिळणार आहे.

हिंगोली पालिकेने मागील काही वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यामध्ये माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ शहर सुंदर शहर, उत्कृष्ठ घरकुल योजना यासह इतर अभियानाचा समावेश आहे. हिंगोली पालिकेची केंद्र शासना सोबतच राज्य शासनानेही दखल घेतली आहे.

दरम्यान, शहरातील तसेच बाहेरगावी राहणाऱ्या हिंगोलीकरांना पालिकेचा कर भरण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला होता. त्यासाठी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी व्हॉटस्‌अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार याची सर्व कार्यप्रमाणाली तयार करण्यात आली असून त्याचे उदघाटन मंगळवारी ता. ३ सकाळी आकरा वाजता नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, उमेश हेंबाडे, बाळू बांगर, पंडीत मस्के, प्रणव पांडे यांची उपस्थिती होती.

कर भरणा करणे झाले सोपे
हिंगोली शहरात मालमत्ता असलेल्या तसेच नाेकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या नागरीकांना व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून कर भरता येणार आहे. पालिकेच्या व्हाॅटस्‌अप क्रमांकावर संदेश पाठविल्यानंतर त्या व्यक्तीच्या नांवे शहरात किती मालमत्ता आहे, त्याची घरपट्टी किती, नळ पट्टी किती याची माहिती मिळणार आहेत. त्यानंतर कर भरणा केल्यानंतर त्याची पावती देखील लगेच व्हाॅटस्‌अपवरच मिळणार आहे. त्यामुळे पावती मिळाली नाही अशा तक्रारी कमी होतील.

पालिकेच्या सेवाबद्दलही मिळणार माहिती
हिंगोली पालिकेकडून नागरीकांना दिलेल्या जाणाऱ्या सेवा व विविध प्रमाणपत्रांची माहिती यावर अाहे.यामध्ये कोणत्या प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे लागतील याची माहिती त्यावर असणार आहे. त्यामुळे पालिकेत येऊन कागदपत्रांबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्याही कमी होणार आहे.

मनुष्यबळाचा वापर इतर कामांसाठी ः डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली पालिका
दरवर्षी कर गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सकाळपासूनच नागरीकांकडे जावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर होऊ लागला होता. मात्र आता या सिस्टीममुळे मनुष्यबळावरील कामाचा ताण हलका होणार असून त्यांना इतर ठिकाणी कामे दिली जाणार आहे. प्रत्येक कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने पालिका प्रशासनाचे कामकाज अधिक गतीमान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...