आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मोबाईल सुरु केला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला, तीन एटीएम मधून 46500 रुपये लांबविणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन एटीएम मध्ये छेडछाड करून ४६५०० रुपये पळविणाऱ्यां चौघांपैकी दोघे जण पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे. मोबाईल काही काळासाठी सुरु केल्याने तो पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये तिघे जण हरियाणा राज्यातील असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याने प्राथमिक चौकशीत परभणी येथील दोन एटीएम फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील देवडानगर, चित्रा कलर लॅब व मोंढा भागात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी शुक्रवारी ता. १८ दोन ते तीन चोरट्यांनी एटीएममध्ये जाऊन काही रक्कम काढली. त्यानंतर ज्या ठिकाणावरून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी रॉड टाकून पैसे असलेेला ट्रे अडकवून त्यातील एकूण ४६५०० रुपये पळविले. या एटीएम मशीनच्या दुरुस्तीची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाहणीत हे स्पष्ट झाले. त्यावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १९ रात्री तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, प्रभारी पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार जाधव, शेख शकील, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, दिलीप बांगर, सायबल सेलचे जयप्रकाश झाडे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी रविवारी ता. २० सायंकाळी एकास हिंगोली शहरालगत नवीन वासहतीमधून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी यापुर्वी परभणी येथेही दोन एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. यामध्ये एका स्थानिक तरुणाचा समावेश असून पोलिसांनी त्यास आज सोमवारी ता. २१ पहाटे जालना येथून ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले दोघे जण राज्याबाहेर पळून गेले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बाहेर राज्यात पाठविण्यात आले आहे.

मोबाईल सुरु झाला अन आरोपी पोलिसांच्या हाती लागला
या घटनेनंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी तपासात स्वतः लक्ष घातले. एटीएम मधून त्यावेळी कोणत्या खात्यावरून पैसे काढण्यात आले त्यावरून सर्व माहिती गोळा करून एकाचा मोबाईल क्रमांक शोधला. त्याने काही काळासाठी मोबाईल सुरु करताच रविवारी ता. २० सायंकाळी पोलिसांनी शहरालगत अकोला बायपास येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. तो तरुण मुळचा हरियाणाचा असून तो मागील दोन वर्षापासून हिंगोली शहरालगत राहात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...