आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हिंगोलीत बंपर लकी ड्रॉने वाढले लसीकरण; पहिले पारितोषिक एलईडी टीव्ही

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोत्साहनपर पाच मिक्सर ग्राइंडर पारितोषिकांचेही वितरण

हिंगोली शहरामध्ये कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने बंपर लकी ड्रॉ योजना हाती घेतली. या योजनेमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढली असून शनिवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लकी ड्रॉ काढण्यात आला. यात पहिले पारितोषिक एलईडी टीव्ही, द्वितीय फ्रिज, तृतीय वॉशिंग मशीन व प्रोत्साहनपर पाच मिक्सर ग्राइंडर पारितोषिक देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयासह शासनानेही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली येथे भेट देऊन लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात योग्य नियोजन करावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारादेखील केंद्रेकर यांनी दिला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने लसीकरणासाठी नियोजन करीत हर हर दस्तक हा उपक्रम सुरू केला. यामध्ये घरोघर जाऊन लाभार्थींना लसीकरण केले जात आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरात जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी बंपर लकी ड्रॉ योजना जाहीर केली. यामध्ये १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये लसीकरण झालेल्या लाभार्थींमधून लकी ड्रॉ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांसाठी आठ पारितोषके व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींसाठी आठ पारितोषिके ठेवण्यात आली होती.

या योजनेमुळे लसीकरणालाही चांगला फायदा झाला. पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची लसीकरणाची टक्केवारी ६८ वरून ८३ टक्के वर पोहोचली, तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींची टक्केवारी ५६ वरून ६९ टक्के वर पोहोचली आहे. दरम्यान, आज पालिकेच्या सभागृहामध्ये पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, रत्नाकर महाजन, श्याम माळवटकर, डॉ. नामदेव कोरडे, डॉ. नंदिनी भगत, सनोबर तसलीम, बाळू बांगर, पत्रकार प्रद्युम्न गिरीकर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला.

नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे
विश्वास बांगर व जान्हवी कुरवाडे या मुलांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये विजेत्यांना पहिले पारितोषिक एलईडी टीव्ही, द्वितीय फ्रिज, तृतीय वॉशिंग मशीन व प्रोत्साहनपर पाच मिक्सर ग्राइंडर आदी पारितोषिक देण्यात आले. दरम्यान, अद्यापही शहरातील ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...