अजुनही परदेश दौऱ्यांची माहिती लपवत आहेत लोक, बुलडाणातील धामणगाव येथे ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल

  • सौदी अरेबिया दौऱ्याची माहिती शासनाला दिलीच नाही, बुलडाणात दुसरा गुन्हा दाखल

प्रतिनिधी

Mar 25,2020 09:32:46 PM IST

धामगाव बढे (बुलडाणा) - कोरोना व्हायरसच्य पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी निर्देश दिले जात असतानाही लोक स्वतःसह इतरांचे आयुष्य धोक्यात टाकताना दिसून येत आहेत. बुलडाणातील धामगाव बढे परिसरात एका 65 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने आपल्या परदेश दौऱ्याची माहिती लपविली होती. या प्रकरणी धामगाव बढे येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून मोताला तहसिलदारांच्या निर्देशानुसार, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धामगाव बढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती १३ मार्च रोजी सौदी अरेबियातून मुंबई विमानतळावर आला होता. १४ मार्च रोजी धामगाव बढे येथे तो आला. कोरोना बाधीत देशातून प्रवास केल्यानंतरही त्या विषयाची माहिती कोरोना नियंत्रण कक्ष व एकात्मिक रोग सर्व्हेक्षण प्रकल्प कक्षास दिली नाही. वास्तविक १४ मार्च २०२० च्या अधिसुचनेनुसार ती देणे बंधनकारक आहे. परिणामी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष नारखेडे यांनी संबंधीत व्यक्तीच्या घरी जावून चौकशी केली असता संबंधीत व्यक्तीने कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. प्रकरणी संबंधित व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या एका दिवसापूर्वीच वडगाव खंडोपंत येथील दोघांनी होम क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात २३ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरचा हा जिल्ह्यातील दुसरा गुन्हा असून एकट्या मोताळा तालुक्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

X