आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्हयात कोरोनाची तिसरी लाट व ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत. या शिवाय कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील तीन हजार बेड आरक्षीत करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. यासाठी सर्व यंत्रणांना कामांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. त्यासाठी ता. १० जानेवारी पासून सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्ट्या रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. या शिवाय आरोग्य विभागाने कोविड चाचणयांसाठी आवश्यक किट उपलब्ध करावे, खाजगी रुग्णालयांमधून किमान ३००० बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करावे, कोविड रुग्णांची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल २४ तासात द्यावा, ऑक्सिजन प्लॅट शुक्रवारपर्यंत ता. ११ सुरु होतील याचे नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर सोपवली आहे.
या शिवाय ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकडे उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाने लक्ष द्यावे तर वाहनामध्ये पोलिस विभागाने एक पोलिस कर्मचारी तैनात करण्याच्या सुचना पापळकर यांनी दिल्या. कोविड रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ट्रेसींगच्या कामाचे नियोजन करावे. जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर व इतर केविड सेंटरमध्ये विद्युत व्यवस्थेची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शासकिय, निमशासकिय कार्यालय व गर्दीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमधून आरटीपीसीआर व रॅपीड ॲन्टीजन चाचणीचे स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सुचनाही पापळकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांची वाहतुक करणाऱ्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, औषधी, वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
भोजन कक्षाला वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करा
कोविड रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. मात्र त्यामध्ये तक्रारी येऊ नये यासाठी भोजन कक्षाला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करण्याच्या सुचना पापळकर यांनी दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.