आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सेनगाववरून निघालेले 208 कट्टे स्वस्तधान्य पोहोचले थेट वाशीमच्या काळ्याबाजारात

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या गोदामातून निघालेले स्वस्त धान्याचे २०८ कट्टे धान्य सेनगाव येथून निघाल्यानंतर थेट वाशीमच्या काळ्याबाजारात पोहोचले. शुक्रवारी ता. १८ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चौकशीतून हा प्रकार उघड झाला असून या प्रकरणात आता तहसील प्रशासन काय भुमीका घेणार याकडे तालुक्यातील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या गाेदामातून एका टेम्पोमध्ये (क्र.एमएच२६-एडी-०६३७) स्वस्त धान्याचा बटवाडी येथील दुकानदाराचा १२७ कट्टे गहू व ८१ कट्टे तांदूळ असे एकूण २०८ कट्टे धान्य शुक्रवारी ता. १८ सायंकाळी भरण्यात आले होते. त्यानंतर हा टेम्पो बटवाडी येथे जाणे अपेक्षीत होता.

मात्र टेम्पो सेनगाव येथून निघाल्यानंतर हा टेम्पो गोरेगाव ते वाशीम रोडवर कोकलगाव ते विरेगावच्या मध्ये थांबविण्यात आला. त्यानंतर वाशीम येथून आलेल्या एका वाहनामध्ये टेम्पोतील सर्व धान्याचे कट्टे भरून ते वाहन वाशीमकडे गेले. तर रात्रीच्या वेळी रिकामा असलेला टेम्पो बटवाडी येथे आणला जात होता. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, पांडुरंग झाडे, भागवत झाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रात्रीच बटवाडी गाव गाठले. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास रिकामा टेम्पो आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टेम्पो चालकाची चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये त्याने सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकाराची माहिती सेनगाव तहसील कार्यालयास देण्यात आली. त्यानंतर सदर रिकामा झालेला टेम्पो व चालकास गोरेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशी करून गुन्हा दाखल करणार : जीवककुमार कांबळे, तहसीलदार सेनगाव
सेनगाव येथील गोदामातून धान्य भरून टेम्पो बटवाडीकडे निघाला होता. मात्र सदर टेम्पो धान्यासह गावात पोहोचलाच नाही. त्या प्रकरणात संबंधित टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यानंतरच नेमके धान्य कुठे विक्री झाले हो स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...