आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्यात रविवारी ता. 11 सकाळी 8.30 वाजता भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यावेळी भुगर्भात झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामीण भागातून गावकऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचे चित्र होते. यवतमाळ जिल्हयातील महागाव येथे भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून भुगर्भात मोठे आवाज होण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेषतः वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांमधून हा आवाज जाणवत आहे. मात्र भुगर्भातील पोकळीमध्ये पाणी शिरल्याने हा आवाज होत असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज सकाळी 8.30 वाजता भुगर्भातून पुन्हा मोठा आवाज झाला. विशेष म्हणजे या आवाजाची व्याप्ती संपूर्ण जिल्हाभर होती. हिंगोली शहरातही हा आवाज चांगलाच जाणवला. सुमारे 5 ते 7 सेकंदपर्यंत हा आवाज होता. तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, मरसुळ, वाई, आंबा, कोर्टा, टाकळगाव, म्हातारगाव, इंजनगाव, सेलु, आंबा, शिवपुरी, बोराळा, डोणवाडा या भागातही भुकंपाचे धक्के जाणवल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली तालुका, कळमनुरी तालुक्यात देखील हे धक्के जाणवले आहे.
काही घरांना गेले तडे
या संदर्भात पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या आवाजामध्ये हा सर्वात मोठा आवाज होता. मातीच्या घरांना काही ठिकाणी तडे गेल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप
या संदर्भात स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाच्या भुकंपशास्त्र विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 4.4 रिश्टर स्केलचा भुकंप झाल्याचे सांगितले. तोच भुकंप हिंगोली जिल्हयात जाणवला का याची माहिती घेतली जात आहे. तर प्रशासनाने सदर भुकंपाचे केंद्र बिंदू यवतमाळ जिल्हयातील महागाव येथे असल्याचे सांगितले. दहा किलो मिटर खोलीवर हा भुकंप झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरीकांनी घाबरून जाऊ नये - रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली
हिंगोली जिल्हयात भुगर्भातून मोठा आवाज झाला आहे. मात्र गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. यामुळे काही नुकसान झाले असल्यास त्याची तातडीने माहिती सादर करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार महसुलचे पथक प्रत्येक गावातून माहिती घेत आहे. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास प्रशासन सज्ज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.