आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील एका दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बांधकामात सिमेंटच्या खांबामध्ये बुधवारी ता. २१ दुपारी मसण्याऊद व त्याची चार पिल्ले आढळून आली. हिंगोलीच्या सर्पमित्रांनी तातडीने शाळेत जाऊन त्यांना ताब्यात घेतले असून वन विभागाच्या हवाली केले आहे.
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे सर्वपल्ली राधाकृष्णन दिव्यांग विद्यालय आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळा असून सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे. पुढील काही दिवसांतच शाळा सुरु होण्याची शक्यता असल्याने संस्थेचे अध्यक्ष प्रेमकिशोर गावंडे, मुख्याध्यापक पांडूरंग दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन दिवसापासून साफसफाईचे काम सुरु होते.
त्यानंतर शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील खांब भरण्याचे काम शिल्लक असल्याने आज दुपारच्या सुमारास गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यात आले. मात्र खांब भरण्याच्या कामाची पाहणी करीत असतांना त्यात एक प्राणी व त्याची चार पिल्ले दिसून आली. सदर प्राणी नेमका कोणता आहे याची ओळखही कोणाला नसल्याने सर्पमित्र प्रेमकुमार गावंडे यांनी तातडीने हिंगोली येथील सर्पमित्र विजयराज पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांच्यासह बाळू ढोके, सचिन कानखेडे, अजय एकशिंगे, पवन गोरे, किरण सोनटक्के, वैभवराज कऱ्हाळे यांनी तातडीने भाटेगाव गाठले.
दरम्यान, दुपारी त्या ठिकाणी पाहणी केली असता तो प्राणी मसण्याऊद असल्याचे स्पष्ट झाले. सर्पमित्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मादी मसण्याऊद व चार पिल्ले खांबातून बाहेर काढली. त्यांना एका पोत्यात बांधून हिंगोलीत आणले जात असून त्यांना वन विभागाच्या हवाली करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रीत दुर्मिळ आढळणारा प्राणी ः डॉ. प्रेमेंद्र बोथरा, पक्षी व प्राणी अभ्यासक
मसण्या ऊद या प्राण्याला पाण मांजर असेही म्हणतात. हा प्राणी झाडाच्या ढोलीत राहतो. रात्रीच्या वेळी ढोलीतून बाहेर पडतो. मासे हे या प्राण्याचे प्रमुख भक्ष आहे. मात्र त्यासोबत खेकडे, पाली देखील तो खातो. या प्राण्यांचे प्रजनन कमी असल्याने हे प्राणी कमी संख्येने आहेत. स्मशानभुमीत प्रेत उकरून खाणारा प्राणी असल्याची भ्रामक कल्पना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.