आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:कोरोनाने पती हिरावल्याने रडत बसण्यापेक्षा सुरू केली पिठाची गिरणी, पदर खोचून संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिला झाली सज्ज

पाडळसरे (वसंतराव पाटील)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगरूळच्या साधना पाटील यांनी पतीच्या निधनानंतर महिलांपुढे ठेवला नवा आदर्श

ग्रामीण भागातील स्त्री ही अबला ,हिंमत नसलेल्या , दुनियादारी पासून दूर असल्याचा समज आजही शहरी भागातील स्त्रीयात आहे ,ग्रामीण स्त्री "चूल आणि मूल" यालाचं ती आपलं आयुष्य मानते. पण; ग्रामीण स्त्री ही भावनिक असल्याने समाजाने तिला विनाकारण हा शिक्का लावून ठेवला आहे. मात्र, पुरुषांना मागे टाकत ग्रामीण स्त्रिया आजही संकटावर मात करून खंबीरपणे उभ्या राहताना दिसत आहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणून अमळनेर तालुक्यातील मंगरूळच्या साधना सुनील पाटील यांनी पतीचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच आपले सारे दुख बाजूला सारत आपल्या कुटुंबाची पालनहार होण्यासाठी डोळ्यातील पाणी आपल्या साडीच्या पदराने पुसून तोच पदर खोचला आणि जिद्द व मेहनत करून चक्क ती पिठगिरणी संचालक बनून दुःखावर मात करत महिलांना नवी प्रेरणा व आदर्श निर्माण करून आपल्या घराच्या प्रपंच ओढण्यास सुरुवात केली आहे.

श्रीमती साधना पाटील यांचे पती सुनील पाटील ( वय ५०) हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पंधरा दिवसाच्या जीवन मृत्यूचा संघर्ष करत अखेर १५ एप्रिल रोजी जळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालं आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी साधनाताईना वैधव्य आलं. दोन मुली, एक मुलगा सोबतच वृद्ध सासू सासरे घरी आहेत. सासरे मात्र कोरोनातुन बचावले ,कोरोनाने पतींना हिरावून नेल्याने आपसूकच या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती व त्याला जोडव्यवसाय म्हणून त्यांच्या सासऱ्यांनी १९७६ साली गावात पिठाची गिरणी सुरू केली होती. बरेच वर्षे सासऱ्यानी पिठगिरणी चालवली. त्यात त्यानी कुटुंबातील सदस्यांचे संगोपन, शिक्षण, सोबतच कौटुंबिक उदरनिर्वाह चालवत आणला. कालांतराने त्यांचे पती सुनील पाटील यांनी पिठगिरणीचा व्यवसाय सांभाळला. त्यानी पण तब्बल २५ वर्षे पिठाची गिरणी सांभाळली. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. त्यात होत्याचे नव्हते झाले. अन १५ एप्रिलला पतीचे निधन झाले.

पतीचे कोरोनामुळे झालेल्या निधनाने खचून जाऊन ,आता आपल्या कुटुंबीयांचे कसे होईल म्हणून सतावत होती चिंता ,पण?
पर्यायाने गेली २५ वर्षे सांभाळत असलेल्या पिठाच्या गिरणीची चाके थांबली होती, वृद्ध सासरे हे पण कोरोनातून कसेबसे बाहेर आले. तेही थकले असल्याने त्यांच्याकडून आता पिठगिरणी चालविण्याचे काम होत नाही. यामुळे आता सर्वांसमोर प्रश्न पडला की आता पुढं कसं होणार? शेती बिन भरवश्याची झाली आहे. घरात एकही जण सरकारी नोकरीत नाही. मग कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा ? पिठगिरणी बंद करायची की भाड्याने चालवायला द्यायची की कोणी घरचे चालवणार नाही म्हणून विकून टाकायची ? कुटुंब सांभाळणारा व्यक्तीच कोरोनामुळे गेल्याने यापुढील आपणच खंबीरपणे उभे राहून व्यवसाय सांभाळायला हवा, हे साधनाताई ओळखले. वृद्ध सासू सासरे आणि तीन मुलांचा संसार सांभाळणे साधनाताई कठीण जाणार होते. वयाच्या पन्नाशीत पतीचं निधन झाल्याने त्या खचल्या होत्या. घर कसं चालणार ? याची तिला विवंचना होती. पती अचानक सोडून गेल्याचं अपार दुःखही तिला सोसवेना. पतीच्या जाण्याची पोकळी मुळीच भरणारी नाही. पण; या दुखातून तिला सावरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पती चालवत असलेली पिठगिरणी सुरू करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. दीर विकास (भदाणे )पाटील यांनीही त्यांना उमेद दिली. त्या गेल्या पंधरा दिवसांपासून गावात पिठगिरणी चालवत आपला उदरनिर्वाह भागवत संसाराचा गाडा हाकायला सज्ज झाल्या आहेत. दुःख पचवणं कठीण आहे परंतु; त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग त्यानी स्वतःच शोधून काढला. त्यांच्यामुळे अनेक ग्रामीण व शहरी महिलांना प्रेरणा व उमेद मिळाली असून गावातील महिला व पुरुषांनीही साधना पाटील यांचे कौतुक केले आहे.

दुःख सावरून प्रपंचाची जबाबदारी घेत रोजीरोटीला सुरुवात
कोरोनामुळे आज अनेक मुलांचे मातृपितृ छत्र हिरावले गेल्याने ही मुलं उघड्यावर आलीत ,कुणी अनाथ झालीत. त्यांना सांभाळायचं काम सरकार पातळीवर होईलच परंतु; सरकार देऊन-देऊन काय देणार? शेवटी आपल्या रोजी रोटीची व्यवस्था आपल्यालाचं बघावी लागेल. त्यामुळे आपल्या कुटुंबावर आलेल्या विदारक परिस्थितीवर रडत न बसता ,साडीच्या पदराने दुःखी अश्रू पुसून,तोच पदर खोचून संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली, अन्य महिलांनीदेखील या दुखातून सावरत नव्या उमेदीने उभं राहायला हवं आणि आपच्या कुटुंबाचा गाडा पूर्ववत करण्याशिवाय दुसरा पर्याय तरी काय ? असा मौलिक सल्ला ही साधनाताई देतात.

बातम्या आणखी आहेत...