आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष उपक्रम:प्लास्टिक जमा करा अन् कापडी पिशव्या भेट मिळवा, माझी वसुंधरा अभियानात हिंगोली पालिकेचा अनोखा फंडा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लास्टीक पिशव्याचा वापर टाळण्यासाठी नागरीकांना प्रवृत्त करण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये प्लास्टीक जमा करा आणि कापडी पिशव्या भेट मिळावा हा फंडा पालिकेने सुरु केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाला हिंगोलीत शुक्रवारी ता. 7 पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नगर परिषद मार्फत हिंगोली शहरात स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. यामध्ये शहरात प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेचे पथक शहरात विविध ठिकाणी फिरून दुकानांची तपासणी करीत आहेत. यामध्ये प्लस्टीक पिशव्या व इतर प्लास्टीक साहित्य आढळून आलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवावा याकरिता हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या संकल्पनेतून सिंगल युज प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केले आहे. येथील नगर परिषद कार्यालयसमोर हे केंद्र उभारण्यात आले आहे. नागरिकांकडून एकदाच वापरात असलेले प्लास्टिक जमा करून घेण्यात येत आहे व त्यांना भेट म्हणून कापडी पिशवी देण्यात येत आहे.

या संकलन केंद्राचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, अभियंता रत्नाकर अडशिरे, अभियंता सनोबर तसनीम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संदीप घुगे, आशिष रणसिंगे, माधव सुकते, अजय मंडले, करण पऊळकर, अथर्व वर्मा, सागर गडप्पा, आकाश गायकवाड, सुमित कांबळे, रोहित लोखंडे, गजानन जगताप यांची उपस्थिती होती.

या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये आपल्या कडील असलेले एकदाच वापरात येणाऱ्या कॅरीबॅग, प्लास्टीक ग्लास, चमचे, वाट्या, काटे, ताट, कप, स्ट्रॉ ई. प्लास्टिक जमा कराव्यात. त्यानंतर तातडीने कापडी पिशव्या दिल्या जाणार आहेत. आज पहिल्याच दिवशी नागरीकांनी प्लास्टीक देऊन सुमारे शंभरपेक्षा अधिक प्लास्टीक पिशव्यांची भेट मिळविली आहे.​​​​​​​​​​​​​​

नागरीकांनी उपक्रमाला सहकार्य करावे- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली

व्यापारी व नागरीकांनी या ठिकाणी प्लास्टीक जमा करून कापडी पिशव्या घ्यावात. कार्यालयामार्फत नियुक्त पथका मार्फत तपासणीमध्ये कुठे प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरीकांनीही या उपक्रमाला सहाकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...