आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सकाळी केली रेकी अन् दुपारी बँक लुटण्याचा प्रयत्न, लिफ्टचे काम करणाऱ्या आरोपींनी आणले होते उत्तरप्रदेशातून गावठी पिस्टल

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील चोंढी आंबा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील रक्कम लुटण्यासाठी तीनही आरोपींची सखोल चौकशी केली जात असून त्यातून त्यांनी शुक्रवारी (ता. 14) सकाळी आकरा वाजता बँकेची रेकी केली आणि सायंकाळी बँक बंद होत असताना बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले. तर यासाठी वापरण्यात आलेले गावठी पिस्टल देखील त्यांनी उत्तरप्रदेशातूनच आणल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

तीनही आरोपींना बेड्या

चोंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतून रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कुरुंदा, आखाडा बाळापूर पोलिसांसोबतच बोथी येथील गावकऱ्यांच्या सतर्कतेने अवघ्या दोन तासात अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार देवकर, जाधव,भोपे यांच्या पथकाने रात्री त्यांची सखोल चौकशी केली. यामध्ये अनेक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

नांदेडसह इतर जिल्हयांमध्ये उत्तरदेशातील संदीप मटरू यादव (रा. धोराधार, उत्तरप्रदेश), व शहबाज जमील अन्सारी (रा. नानपारा उत्तरप्रदेश) हे दोघे लिफ्ट दुरुस्तीचे तसेच नवीन लिफ्टचे काम करतात. मागील काही दिवसांपुर्वीच त्यांची वसमत येथील आयास अहेमद गफुर याच्या सोबत ओळख झाली. त्यातून त्यांनी लिफ्टचे काम सुरु केले.

असा केला होता बँक लुटीचा प्लॅन?

काम सुरु असतानाच चोंढी टी पॉईंट येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतील रक्कम लुटण्याचा त्यांनी प्लॅन केले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ​​​​​वसमत येथून चोंढी टी पॉईंटवरील बँकेची रेकी केली. बँकेत किती लोक आहेत, पळण्यासाठी कोणता रस्ता योग्य राहिल याची माहिती घेऊन ते शिरडशहापूर येथे जाऊन थांबले. दुपारच्या सुमारास बँकेत जाऊन रक्कम लुटण्याचे ठरले होते. मात्र शिरडशहापूर ते वसमत मार्गावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरु होती. त्यामुळे पोलिस निघून जाण्याची वाट पाहात थांबले. दुपारी सव्वा चार वाजे पर्यंत पोलिस कर्मचारी वाहनावरील कारवाई करीत होते. त्यामुळे आता बँक बंद होईल यामुळे त्या तिघांनी धाडस करून अवघ्या पाच मिनीटात बँकेची रक्कम लुटुन पळण्याचे ठरविले.

त्यानुसार साडेचार वाजता ते बँकेत गेले. मात्र कॅशीयरच्या ऐवजी ते मॅनेजरच्याच केबीनमध्ये गेले. मात्र त्या ठिकाणी त्यांना काहीही मिळाले नाही. हाती पाच मिनीटाचाच वेळ असल्याने त्यांनी रिकाम्या हातानेच बँकेतून काढता पाय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

दरम्यान, बँक लुटीसाठी त्यांनी उत्तरप्रदेशातूनच पिस्टल आणल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...