आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli | Marathi News | Police Reached The Thieves With The Help Of A Bag Hanging On Their Backs; Two Arrested, One Arrested

हिंगोली पोलिसांची कामगिरी:पाठीवर लटकवलेल्या बॅगेच्या साहाय्याने पोलिस पोहोचले चोरट्यांपर्यंत; दोघांना अटक, एक देशीकट्टा जप्त

हिंगोली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील बियाणी नगर भागात भरदुपारी घरात शिरलेल्या दोन चोरट्यांनी महिलेवर चाकूने वार करुन जखमी केले अन महिला व त्यांच्या मुलांना बांधून ठेवत घरातील ४.५० लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. मात्र पोलिसांनी चोरट्यांच्या पाठीवरील बॅगवरून त्यांचा माग काढत दोन जणांना बुधवारी ता. १२ बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी कट्टा व दागिने ऐवज जप्त केला आहे.

हिंगोली शहरातील बियाणी नगर भागात गुरुवारी ता. ३० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी अंजली कल्याणकर यांच्या घरात प्रवेश करून त्यांना बांधून ठेवले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हातावर चाकूचे वारही केले. त्यानंतर त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४.५० लाखांचा ऐवज पळविला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या पाठीवर पार्सल देण्यासाठी वापरली जाणारी बॅग दिसून आली.

त्यावरून सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, जमादार भगवान आडे,नितीन गोरे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, शेख जावेद, आकाश टापरे, जयप्रकाश झाडे, सुमीत टाले, यांच्या पथकाने शहरात कुरीयर वाटप करणाऱ्यांची चौकशी केली. यामध्ये एका कुरीयर कंपनीतील चंद्रकांत काकडे (रा. मानकेश्वर ता. जिंतूर, ह. मु. हिंगोली) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास आज अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदार नचिकेत वाघमारे (रा. भोईपुरा, हिंगोली) यास अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला देशीकट्टा जप्त केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत व नचिकेत हे दोघे परभणी येथे शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. चंद्रकांत याने हिंगोलीत कुरीयरचे पार्सल वाटपाचे काम सुरु केले. त्यानंतर त्याने तीन महिन्यात तब्बल १५ ते २० वेळा कल्याणकर यांच्या घरी कुरीयर दिले. दुपारच्या वेळी त्यांच्या घरात कोणी नसते हे लक्षात घेऊन चंद्रकांत व नचिकेत यांनी जबरी चोरी केली. त्यानंतर नचिकेत मध्यप्रदेशात पळून गेला होता. पोलिसांनी त्यालाही आज पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून देशीकट्टा, सोन्याचे दागिने, दुचाकी असा ४.५० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...