आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील खापरखेडा व वाकोडी शिवारात गंगाखेड शुगर ॲण्ड एजन्सी लि. विजयनगर माकणी तर्फे नंदकिशोर शर्मा (रा. उमरखेड) या नावे असलेली सुमारे ३९ हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी जप्त केली आहे. त्यामुळे आता या जमीनीवर अंमलबजावणी संचालनालयाचा ताबा राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शुगर ॲण्ड एजन्सी विजयनगर माकणी यांनी कळमनुरी तालुक्यातील वाकोडी व खापरखेडा शिवारात शेत जमीन खरेदी केली होती. या दोन्ही शिवारात पाच गटांमध्ये सुमारे ३९ हेक्टर जमीन खरेदी केली होती. या ठिकाणी साखर कारखाना सुरु करण्याचा त्यांचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले होते. सुमारे सात ते आठ वर्षापुर्वी खरेदी केल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, आज मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी सुमीत रॉय यांच्या पथकाने कळमनुरी येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी त्यांनी तहसीलदा सुरेखा नांदे यांच्याशी चर्चा करून वाकोडी व खापरखेडा शिवारातील गट क्रमांक व स्थळ निश्चितीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सोबत देण्याबाबत सांगितले. त्यावरून मंडळ अधिकारी किरण पावडे, खापरखेडा येथील तलाठी रेवता लुटे, वाकोडी येथील तलाठी गंगाधर पाखरे यांना सोबत घेऊन ईडीच्या पथकाने ३९ हेक्टर जमीन सील करून ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी ईडीचा फलक देखील लावण्यात आला आहे.
दरम्यान, वाकोडी येथील गट क्रमांक ९८ मधील १०.९९ हेक्टर, गट क्रमांक ८६ मधील २.८४ हेक्टर, गट क्रमांक ८७ मधील ७.९९ हेक्टर जमीन सील केली आहे. तर खापरखेडा शिवारातील गट क्रमांक १४२ मधील १४ हेक्टर तर गट क्रमांक १३७ मधील ३.८० हेक्टर जमीन सील केली आहे. सदर जमीनीची सातबारा गंगाखेड शुगर ॲण्ड एजन्सी लि. विजयनगर माकणी तर्फे मुख्यारआम मुख्य शेतकी अधिकारी नंदकिशोर शर्मा (रा. उमरखेड) यांच्या नावे असल्याचे महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.