आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आला होता... पण वेळ नव्हती!:पुराच्या पाण्यात मजूराचा पाच किलो मिटर जिवघेणा प्रवास, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे धोका टळला

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यात मागील चोविस तासात अतिवृष्टी झाली. त्यामुळे कयाधू नदीला पुर आला. या पुराच्या पाण्यातच डोंगरगाव येथील मजूर रामन फकीरराव पावडे (५५) हे मासे पकडत होते. मात्र यावेळी त्यांच्या पाठीमागून पुराच्या पाण्यात वाहात आलेल्या सोयाबीनच्या गंजीला त्यांची होडी अडकली आणि ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. पाण्याचा वेग लक्षात घेता त्यांनी जिवाच्या आकांताने होडी व सोयाबीनच्या गंजीची ताडपत्री धरून ठेवली. रविवारी ता. 17 सकाळी हा प्रकार घडला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय पावडे यांना आला.

पुराच्या पाण्याच्या मधोमध भागातून सोयाबीनची गंजी वाहू लागल्याने त्यांना उडी मारण्याची संधीही मिळाली नाही. कोणी तरी पाहिले आणि आपली सुटका करेन या अपेक्षेने त्यांनी पुराच्या पाण्यातून प्रवास सुरुच ठेवला. पुढे तीन किलो मिटर अंतरावर पिंपरी येथील प्रशांत जाधव यांनी हा प्रकार पाहिला. यावेळी त्यांनी तातडीने शेवाळा येथील शिवसेना पदाधिकारी तथा माजी उपसभापती अजय सावंत यांच्याशी संपर्क साधला. एक व्यक्ती सोयाबीनच्या गंजीला धरून वाहात येत असून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती केली.

या प्रकारानंतर अजय सावंत यांनी तातडीने गावकरी बालाजी सावंत, विजय सुर्यवंशी, शंकर सावंत, सुनील सावंत, संदीप सावंत, अमोल सावंत, अशोक मेंढरे, भगवान कदम, अमर सावंत, डिगांबर सावंत, बालाजी मांडगे, प्रदीप सावंत यांना सोबत घेऊन कयाधू नदीचा पुल गाठला. तसेच या घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांनाही दिली. दरम्यान, शेवाळा येथील पुलाला लागूनच पाणी वाहात असल्याने पावडे यांना वाचविणे शक्य होते. मात्र धोका नको म्हणून दोरी, ट्यूब व पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन सज्ज असलेल्या सावंत यांनी पावडे हे दिसताच पुराच्या पाण्यात दोरी टाकली आणि उपस्थितांनी मानवी साखळी करून पुराच्या पाण्यातून पावडे यांना सुखरूप बाहेर काढले. पुराच्या पाण्यातील तब्बल पाच किलो मिटर अंतराचा जिवघेणा प्रवास अखेर संपला. पावडे यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका व्यक्तीचा जीव वाचविण्याचे समाधान -

पिंपरी येथून या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनीटात सर्व साहित्य जमा केले अन पोहणाऱ्या व्यक्तींनाही सोबत घेतले. गंजीला धरून आलेल्या पावडे यांना मानवी साखळी करून हाताला धरून बाहेर काढले. यावेळी ते प्रचंड घाबरलेले होते. मात्र त्यांना धिर देऊन पोलिसांच्या हवाली केले. एका व्यक्तीचा जीव वाचविण्याचे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया माजी उपसभापती अजय सावंत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...