आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत माऊली भागात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १५) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. उत्तमराव संपतराव काळे (५९) असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम काळे हे एक वर्षापुर्वीच सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्ती नंतर हक्काचे घर असावे यासाठी त्यांनी वाशीम येथील मोतीलाल ओसवाल फायनांन्स कंपनी यांच्याकडून घरबांधणीसाठी ६.९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज फेडीच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली आले होते.

दरम्यान, गुरुवारी ता. १४ सकाळी पावने सहा वाजता ते फिरण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ होऊन देखील ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. या सोबतच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रितसर अर्ज देखील दिला. त्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह बळसोंड शिवारातील एका शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मळघने, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार गजानन पोकळे, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी दुर्गेश्वर काळे यांच्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार पोकळे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, मयत काळे यांच्यावर त्यांच्या मुळगावी चोंडी (ता.सेनगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...