आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा शेती:हिंगोलीत 7 लाख रुपये किंमतीचा 97 किलो गांजाची झाडे जप्त, पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील टेंभूर्णी शिवारातील एका शेतात हट्टा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संयुक्तपणे छापा टाकून 7 लाख रुपये किंमतीचा 97 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणात हट्टा पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून रावसाहेब सवंडकर असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील टेंभूर्णी शिवारात एका शेतामध्ये पपईच्या झाडांमध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन सरोदे, जमादार गजभार, सोनटक्के, राजू ठाकूर, विजय घुगे यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास सवंडकर यांच्या शेतात छापा टाकला.

यामध्ये पपईच्या झाडांमध्ये गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. सदर झाडे सुमारे सहा फुटापेक्षा उंच आहेत. पोलिसांनी केलेल्या मोजणीमध्ये सदरील झाडांची संख्या 32 असल्याचे सांगण्यात आले असून त्याचे वजन 97 किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गांजाच्या झाडांची किंमत 7 लाख रुपये असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी सर्व झाडे उपटून जप्त केली आहे. तसेच शेतकरी सवंडकर यास ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...