आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:दाती शिवारात दोन दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार, तीन जखमी

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर दाती शिवारात दोन दुचाकीची समोरा समोर झालेल्या धडकेत एक महिला ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. २१ दुपारी साडेचार वाजता घडली आहे. शेख समीना (रा. हिंगोली) असे मयत महिलेचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील लोभाजी धोंडीबा खुडे हे त्यांची मुलगी स्वाती लोभाजी खुडे हिच्या सोबत कळमनुरी येथे आले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन दाती शिवारात आले असतांना त्यांच्या वाहनाची अर्धापूर कडून हिंगोलीकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनासोबत धडक झाली.

या अपघातात दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या शेख समीना (रा.हिंगोली) ह्या दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच ठार झाल्या. तर त्यांचा भाऊ शेख फरीद (रा. पांगरी, ता. अर्धापूर) हे जखमी झाले. तर लोभाजी खाडे व स्वाती खाडे हे देखील जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार संजय मार्के, राजू जाधव, राजेश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. जखमींना तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यामध्ये लोभाजी खुडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे. तर शेख फरीद व स्वाती खुडे यांच्यावर आखाडा बाळापूर येथे उपचार केले जात आहेत. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...