आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli Vasmat | Marathi News | Bank Robbery Vasmat Taluka | Attempted Bank Robbery In Wasmat; Two Rounds Of Fire From Thieves; Cashier Injured

बँक लुटण्याचा प्रयत्न:वसमतच्या चोंढीआंबा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न; चोरट्यांकडून दोन राऊंड फायर; रोखपाल जखमी

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोंढीआंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न, रोखपालास काच लागल्याने जखमी
  • चोंढीआंबा येथे 4.30 वाजता बँक लुटण्याचा प्रयत्न, 6 वाजता आरोपी जेरबंद
  • कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने रक्कम वाचली तर पोलिसांनी दोन तासात आरोपी केले जेरबंद

वसमत तालुक्यातील चोंढी आंबा येथील चोंढी टी पॉईंटवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जाऊन तीन चोरट्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना दादच दिले नाही, त्यांच्या सतर्कतेने बँकेतील रक्कम सुरक्षीत राहिली तर अवघ्या दोन तासात पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. शुक्रवारी ता. १४ दुपारी साडेचार वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी पकडलेले दोघे उत्तरप्रदेशातील तर एक जण वसतमचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढीआंबा टी पॉईंटवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. आज साडेचार वाजता बँकेचे अधिकारी इशान खिस्ते, रोखपाल नितीन ननवरे व सेवक भद्रदीप सरोदे हे बँकेत होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या पल्सर वरून तिघे जण बँके समोर आले. त्यापैकी दोघे जण बँकेत शिरले तर एक जण बँकेबाहेरच थांबला. दोघांनी हातातील बंदूक रोखून कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली.

.मात्र बँक बंद झाली अन पैसे नाहीत असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याने चोरट्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. मात्र बँकेतून जातांना चोरट्यांनी दोन राऊंड फायर केले. मात्र राऊंड चॅनल गेटला लागल्यामुळे कुठलीही मोठी हाणी झाली नाही, मात्र बँकेची काच फुटून लागल्याने रोखपाल ननवरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक किशोर कांबळे, कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे, करवंदे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी ओळख पटविण्याचे काम हाती घेतले.

या शिवाय पोलिस अधिक्षक कलासागर यांनी जिल्हाभरात नाकाबंदीचे आदेश दिले. चोंढी शिवारातून आखाडा बाळापूरकडे माळरानावरून चोरटे येतील या शक्यतेने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, कुरुंदा पोलिस ठाण्याचे गोपीनवार, उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी पोलिसांना सोबत घेऊन बोथी शिवार गाठले. या घटनेची माहिती बोधनापोड यांनी गावकऱ्यांनाही दिली होती. त्यामुळे पोलिसांच्या मदतीला गावकरीही धावले.

दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोथी शिवारात तीनही चोरटे पोलिसांच्या हाती लागले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र बोधनापोड यांनी चक्क जीपवर चढून गावकऱ्यांना शांततेते आवाहन केले. त्यानंतर गावकरी शांत झाले. अटक केलेल्या तिघांनाही कुरुंदा येथे आणण्यात आले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तिघांमध्ये संदीप मटरू यादव (रा. धोराधार (उत्तरप्रदेश), शाबान जमील अन्सारी (रा. नानापारा, उत्तरप्रदेश) तर आयास अहमद (रा. वसमत) यांचा समावेश आहे. हे तिघेही लिफ्टचे काम करतात. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे.

पोलिस महासंचालकांनी केले अभिनंदन

बँक लुटीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अवघ्या दोन तासात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, पंढरीनाथ बोधनापोड यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...