आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील नियोजीत सापळी धरण रद्द करुन कयाधू नदीवर बंधारे बांधण्याच्या मागणीसाठी जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने रविवारी ता. २ सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हिंगोली जिल्हयाचे पाणी पळविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबतच शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्च्यात सहभागी झाले होते.
हिंगोली जिल्हयात कयाधू नदीवर बंधारे बांधण्याचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. तर दुसरीकडे सिंचनाचा अनुशेष दुर करण्यासाठी १४० बंधाऱ्यांचे प्रस्तावही मान्य करण्यात आले नाहीत. तसेच कयाधू नदीचे पाणी इसापुर धरणात नेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून यामुळे कयाधू नदी कोरडी पडून जिल्ह्याचे वाळवंट होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार आज कळमनुरी येथील सामाजिक सभागृहापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. शिवाजी माने, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे पुयनेकर यांच्यासह शेतकरी व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे काही गावांमधून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते.
कळमनुरी तालुक्यातील नियोजित सापळी धरण रद्द करावे, कयाधू नदीवर बंधारे बांधावे यासह इतर मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.