आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'राजीनामा देण्यासाठी उशीर झाला', अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजीनामा येणे अपेक्षितच होते. पण, मला वाटतं की हा राजीनामा देण्यासाठी उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली.'
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती
'राजीनामा जरी आला असला तरी एका गोष्टींचे कोडे मला पडले आहे. इतक्या भयावह घटना, महाराष्ट्रात झाल्या. कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक शब्द बोलत नाहीत? अद्याप त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही ? या संपूर्ण प्रकरणात त्याचे मौन हे अस्वस्थ करणारे आहे. म्हणून मला असं वाटतं की, किमान अशा परिस्थितीत तरी, त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते, ती वाझे काय लादेन आहे का ? ही होती. तो लादेन आहे की दाउद आहे, हे मला माहिती नाही. पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सर्व घडामोडीनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत? हा माझा सवाल आहे,' असे देखील फडणवीस म्हणाले.
...तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही- चंद्रकांत पाटील
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'जो जो चुकेल त्याला शासन, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरदेखील शरद पवारांकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणे बंद केले. मी समाधान व्यक्त करतो की, शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला.' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
'अनिल देशमुख यांनी नैतिकता जपत याआधीच मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार होणे गरजेचे होते. पण असो ! उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं. आता ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण होऊन सत्य जनतेसमोर यावे हीच इच्छा,' असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवुन केला.
मुख्यमंत्र्यांची नैतिकता कुठे गेली ?- नितेश राणे
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला. 'नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतंय. ज्यांना परमबीर सिंह यांनी 100 कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??' असा खोचक टोला राणेंनी लगावला.
आमदार रवी राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा
आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने नैतिक जबाबदारी दाखवत राजीनामा दिला, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे रवी राणा म्हणाले.
आता कोण होणार नवा वसुली मंत्री ?- चित्रा वाघ
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. आता प्रश्न पडतो की, नवीन वसुली मंत्री कोण होणार ? फक्त चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही,' अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.