आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा:18 जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद; म्यूकरमायकोसिस महामारी घोषित

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णांचे कोविड सेंटरमध्ये होणार सक्तीचे अलगीकरण

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. मात्र १८ जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग दर जास्तच आहे. अशा जिल्ह्यांत गृह विलगीकरण पद्धत बंद करून रुग्णांचे कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरण करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले. तसेच कोरोना रुग्णांत उद्भवत असलेल्या म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) आजारास राज्याने अधिसूचित आजारात समावेश केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात कोरोनासह काळी बुरशी या आजाराच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत अाहे. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या महाराष्ट्रात दाखल होतील.

१३१ रुग्णालये अधिसूचित

  • म्यूकरमायकोसिसला महाराष्ट्र शासनाने नोटिफाइबल डिसीज म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे.
  • महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.
  • त्यासाठी राज्यभरात १३१ रुग्णालये अधिसूचित करण्यात आली आहेत. राज्यात २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णांचेच दर लागू करण्याचा प्रयत्न
जनआरोग्य योजनेत नसलेल्या खासगी रुग्णालयांत म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

आता ग्रामीण भागातही कोविड सेंटर उभारणार
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागातसुद्धा कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करावी. राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटिजन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे ७० हजारांच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.

जूनमध्ये ॲम्फोटेरिसिन - बी इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या मिळणार
पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५% निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात म्यूकरमायकोसिसचे २,२४५ रुग्ण
महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसचे एकूण २,२४५ रुग्ण आहेत. त्यावर उपचारासाठीचे ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन खूप महागडे आहे. या इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचे वाटप केले जात आहे. या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

या जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद
सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर या १८ जिल्ह्यांचा कोरोना रुग्णदर अधिक आहे. यामुळे येथील गृहविलगीकरण बंद करण्यात आल्याची घोषणा सरकारने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...