आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज' सभेवर कारवाईची टांगती तलवार:गृहमंत्री म्हणाले- तपास करून निर्णय घेणार, तर राष्ट्रवादीच्या नेत्याची 'मोक्का' लावण्याची मागणी

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता मनसेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी 16 अटी घातल्या होत्या. यापैकी किती अटींचे उल्लंघन झाले याचा अहवाल तयार करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी घातल्या होत्या 16 अटी

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेचे माजी आमदार आसिफ शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे तसेच त्यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.

औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी 16 अटी घातल्या होत्या. मात्र, मनसेच्या वतीने या सर्व अटी पाळल्या गेल्या नाही. तसेच सभेमध्ये आपल्या वक्तव्यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये भाषण करताना धर्माचा उल्लेख करत मशिदीवरील भोंग्यांवर देखील टीका केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पोलिस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी ही सभा शांततेत पार पडली. त्यामुळे राज्य सरकार तसेच पोलिस आयुक्त यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

राज ठाकरे यांच्या सभेमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे नेते तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यात आता कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

पोलिस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी घातलेल्या 16 पैकी किती अटींचे उल्लंघन झाले याचा तपास करून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या सभेच्या माध्यमातून नियम मोडले असतील तर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका आधीच पोलिसांनी घेतली होती. ही सभा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी घेतलेली मेहनत आणि वापरलेले कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मात्र, आता सभेनंतर मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कायदेशीर कारवाईबाबत मुंबईत उद्या बैठक

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईमध्ये उद्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांची भूमीका महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीनंतरच या प्रकरणात कायेदशीर कारवाई बाबत निर्णय स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...