आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे किमान तापमानात वाढ, हुडहुडी भरणारी थंडी गायब

परभणी / राेहन पावडे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात दक्षिणेकडील समुद्रसपाटीपासून आर्द्रता असलेले ईस्टरली वारे येत असल्याने किमान तापमानात वाढ होत आहे. सध्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात हुडहुडी भरणाऱ्या थंडीचे आगमन झाले होते. दरवर्षी जानेवारी महिन्यातही बऱ्यापैकी थंडी असते. पण यंदा कमाल आणि किमान तापमानात वाढलेले दिसते.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमान ८ अंश सेल्सियसवर गेले होते. त्यानंतर मात्र त्यात वाढ झाली. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट झाली होती. त्यानंतरच्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होत राहिली. डिसेंबर महिन्यात २१ रोजी ५.६, २२ रोजी ५.१, २३ रोजी ५.५ किमान तापमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रात नोंदवले गेले. त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगाळ वातावरण व पावसाळी वातावरण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ८ रोजी २१ अंश सेल्सियस इतक्या किमान तर २९.६ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता दक्षिणेकडील समुद्रसपाटीकडून आर्द्रता असलेले ईस्टरली वारे येत असल्याने किमान तापमानात वाढ हाेऊ लागली आहे.

दाेन जिल्ह्यांत किमान तापमानात घट होईल
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रास प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. २२ व २३ जानेवारी रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी मध्यापासून उन्हाळ्याची चाहूल
जानेवारी महिन्यात साधारणतः १०.७ ते १२ अंश सेल्सियसदरम्यान किमान तापमान राहते. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागते. सध्या दक्षिणेकडील समुद्रसपाटीकडून आर्द्रता असलेले ईस्टरली वारे येत असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. डॉ. कैलास डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रा.कृ.मौ सेवा केंद्र.

बातम्या आणखी आहेत...