आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचे कुलदैवत असलेल्या गणेश मंदिराला साडेतीनशे वर्षे झाली असून तेथे दर्शनासाठी आजही हिंदू भाविकांसोबत हजारो मुस्लिम भाविकही नियमित येतात. वर्षानुवर्षे ही परंपरा कायम आहे. सांगली जिल्ह्यातील विविध देवस्थानांत या धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडते.
मिरजेतील मुस्लिमांचे देवस्थान असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरा या दर्ग्यातील उरूसाचा (गलफ)चा प्रथम मान हा हिंदू समाजाचा असतो. एवढेच नव्हे तर दर्ग्यातील उरूसाच्यावेळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रमही होतो. यावेळी देशभरातील ख्यातनाम गायक हजेरी लावतात. देशभरात कडेगावचा मोहरम प्रसिद्ध आहे. या उत्सवाला लाखो भाविक उपस्थित असतात. यातील डोल्यांच्या पूजेचा प्रथम मान देशपांडे घराण्याकडे पिढ्यांपिढ्या चालत आला आहे. अनेक दर्ग्यांची पूजा करण्याचा मानही ब्राम्हण समाजाकडे आहे.
सांगली शहरातील मोहरम विसर्जनावेळी गणपती मंदिरासमोर डोले नाचवले जातात. यावेळी हिंदू परंपरा जपण्यासाठी मुस्लिमांची वाद्ये बंद ठेवली जातात. याबरोबरच गणेश पंचायतनमार्फत पीराला उद घालण्याचा सोहळाही साजरा होतो. त्यानंतर गणेशाची प्रदक्षिणा पूर्ण केली जाते आणि हे पीर श्रींच्या मूर्तीपुढे नमन होतात. त्यांचे कृष्णामाईमध्ये विसर्जन केले जाते. सांगलीच्या पटवर्धन घराण्याकडूनही नांद्रे येथील हजरत ख्वाजा कबीर, बाबा रहेमत तुल्ला या दर्ग्याला पहिली गलिफ ही अदा केली जाते.
मुस्लिमांकडून संकष्टीचा उपवास
सांगलीचे ग्रामदैवत गणपती पंचायतन हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक प्रमुख देवस्थान आहे. संकष्टीच्या दिवशी या मंदिरात हजारो भाविक येतात. त्यात मुस्लिम, ख्रिश्चन आदी धर्मातीलही लोकांचा समावेश असतो. एवढेच नव्हे तर सांगली शहरात शेकडो मुस्लिम कुटुंबीयांकडून संकष्टीचा उपवासही धरला जातो आणि चंद्रोदय झाल्यानंतर श्री गणेशाची आरती करूनच हा उपवास सोडला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.