आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोरोना'ची गावकथा:लसीसाठी पतीसह दिराचा मृत्यू;सरपंच महिलेचा जिद्दीचा लढा

गणेश सुरसे,मंदार जोशी | वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावची व्यथा, गावात 86 मृत्यू, 73 ची कारणे मात्र गुलदस्त्यात

"विशेष' पदांवर असलेेल्यांचे "विशेष' लसीकरण होत असताना महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावच्या सरपंच शुभांगी चांभारे यांच्या कुटुंबाने मात्र वेगळा आदर्श घालून दिलाय. गावाला लस मिळावी यासाठी सरकारी उंबरे झिजवणाऱ्या त्यांचे पती सुनील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासह त्यांच्या भावाचाही मृत्यू झाला. कुटुंबातील दोन कर्त्यांचा बळी गेल्यावरही घरातलं हे दु:ख बाजूला सारून सरपंच शुभांगी पदर खोचून उभ्या राहिल्या त्या गावाला लस मिळावी यासाठी. लसीकरणासाठी शुभांगी यांचे पती सुनील यांनी तालुक्याला जाऊन अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. यातच लागण झाल्याने त्यांचा आणि त्यांच्या भावाचा मृत्यू झाला, पण बधिर प्रशासन जागे झाले नाही.

पती आणि दिराच्या मृत्यूनंतर या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. पण शुभांगी या आपल्या जबाबदारीला जागत घरातलं दु:ख बाजूला सारून काळजावर दगड ठेवून गावाचे लसीकरण व्हावे यासाठी झगडत आहेत. दुसरे दीर अनिल आणि सासरेदेखील यात त्यांना मदत करीत आहेत.

गावची लोकसंख्या ५ हजार, तपासणी केवळ ३०० गावकऱ्यांची
तरोड्यात गेल्या चार महिन्यांत ८६ जणांचे मृत्यू झाले. त्यापैकी १३ मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. ७३ मृत्यूंचे कारण अस्पष्ट आहे. पाच हजार लोकसंख्येपैकी ३०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. एकही कोरोना चाचणी झाली नाही. गावात एकही लसीकरण शिबिर झाले नाही. काही गावकऱ्यांनी आजूबाजूच्या गावात जाऊन लस घेतली. मात्र सगळ्यांना ते शक्य नाही. त्यामुळे गावातील मृत्यूचे तांडव थांबता थांबेना.

‘राजकीय आजार'ही बळावला
तरोडा ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आहे, तर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्या देवडी विधानसभा क्षेत्रात हे गाव येते. त्यामुळे गावातल्या विकासाचे, योजनांचे श्रेय आणि अपयशाचे खापर कोणावर फोडायचे यात राजकारण सुरू असल्याने राजकीय आजारही बळावला आहे.

राज्यातील व्हीआयपी गाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मा.गो वैद्य यांचे हे गाव आहे . त्यामुळे भाजप आणि संघाचे अनेक मोठे पदाधिकारी या गावात कायम येतात. सरसंघचालक मोहन भागवत, के. सी सुदर्शन, नितीन गडकरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची वर्दळ. खासदार रामदास तडस यांनी हे गाव केंद्र शासनाच्या सांसद आदर्श गाव या योजनेत दत्तक घेतले आहे.

इतर गावांनी दूर लोटले
तरोडा गावात कोरोनाचे थैमान सुरू आहे. या गावातील तरुण दुसऱ्या गावात भाजीपाला विक्रीसाठी जातात तेव्हा त्यांच्यापासून लोक दूर जातात. दुसऱ्या गावात बी-बियाणे घेण्यासाठी जरी तरोड्याचे लोक गेले तर दुसरे गावकरी त्यांच्यापासून दूर सरकतात. या गावात येण्यास लोक टाळत आहेत. अरविंद घोटेकर, ग्रामपंचायत सदस्य

तरोडा, सावली व साकरा या तीन गावांसाठी खरागना येथे शासनाचे आरोग्य उपकेंद्र आहे. ते या गावापासून सुमारे २० किलोमीटरवर आहे. याच केंद्रात अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. गावात कुणालाही त्रास झाला तर २० किलोमीटरची फरपट करावी लागत आहे.

शिबिराचे नियोजन सुरू आहे
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरोडा गावात चाचणी व लसीकरण शिबिर घेण्याचे नियोजन सुरू आहे. या गावात कोरोनामुळे फक्त आठ ते नऊ लोकांचा मृत्यू झाला असावा. - डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...