आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतात कांदा काढणी करणाऱ्या शिरूरमधल्या चांडोहच्या दाम्पत्याला दोघेही पोलिस भरती परीक्षा पास झाल्याची बातमी मिळाली. अन् त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना आभाळही ठेंगणे झाले. त्यामुळे यशवंत तुषार पत्नी भाग्यश्रीला कडेवर उचलून अक्षरशः नाचला. हा आनंदोत्सव पाहून त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
शेलार कुटुंबातल्या या दाम्पत्याच्या यशाची शिरूरच्या पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. गावकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. त्यांच्या यशाने अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.
आनंदाचा दिवस...
चांडोहच्या म्हातरबा शेलार यांच्या कुटुंबाला आजचा दिवस एखाद्या सणाहून मोठा आहे. त्याचे कारण म्हणजे शेतात राबूनही लेक आणि सुनेने मिळवलेले यश. तुषार आणि भाग्यश्री यांचे तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. त्यावेळी त्यांनी पोलिसात भरती व्हायची शपथ घेतली. त्यासाठी त्यांचे अभ्यास आणि व्यायाम असे प्रयत्न सुरू होते. अखेर हे प्रयत्न फळाला आलेत. त्यामुळे गावात आणि पंचक्रोशीत शेलार कुटुंबाच्या या आगळ्यावेगळ्या यशाची चर्चा सुरूय.
अभ्यास, व्यायाम...
पोलिस भरती परीक्षा पास झालेल्या भाग्यश्री शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मला सासरच्यांनी मुलीसारखी वागणूक दिली. सासरे, भाऊ, पतीने खूप सहकार्य केले. अभ्यासासोबत व्यायाम केला. जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद होतेच. त्यामुळे अखेर यश मिळालेच.
चार वर्षांपासून प्रयत्न...
पोलिस भरती परीक्षा पास झालेला तुषार म्हणाला की, गेल्या चार वर्षांपासून भरतीसाठी पळतो आहे. अखेर मला यश मिळाले. पत्नी भाग्यश्रीची साथ महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे आम्ही दोघेही एकाचवेळी पोलिस भरती परीक्षा पास झालो. तो आनंद काही औरच. आम्ही अन्यायाविरुद्ध लढू, असा निर्धार त्याने व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.