आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत प्रवेश:माझा जाणूनबुजून निवडणुकीत पराभव करण्यात आला, मी सुद्धा भाजपचा राजीनामा देत आहे- रोहिणी खडसे

मुक्ताईनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस करणार आहेत. खडसेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, 'ज्या व्यक्तीने 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केले त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणे स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, पण त्यांना सतत दुय्यम वागणूक देण्यात आली. मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील

'मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला पक्षात कुठलाही त्रास नाही,' अशी माहिती भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, रक्षा खडसे यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारीही पक्षातील राहातील आणि लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर होईल, असे सांगण्यात येत आहे.

खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून कथित मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर लागला. त्यांनी फोन करून आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने ते आपल्या पक्षात येत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.

खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत -उद्धव ठाकरे

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांना एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...