आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कौलाविरोधात मुख्यमंत्री झाले. मग विश्वासघात कोणी केला? आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. मग प्रतारणा व गद्दारी कोणी केली, असे सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीरांच्या बाबतीत झालेल्या घटनांचा मी साक्षीदार, समोरून जसे तोंड उघडले जाईल तसे मलाही बोलावे लागेल. अन् योग्य वेळी बरोबर बोलेन,’ असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला.
‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात शनिवारी मालेगाव येथून झाली. यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धर्मवीरांचा चित्रपट काही लोकांना रुचला नाही. अनेक गोष्टी आहेत, ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी भूकंप होईल. आम्ही गद्दारी नाही तर क्रांती केली आहे. ५० लोक पक्षातून बाहेर पडले. या मागच्या आमच्या भूमिकेची ३३ देशांत चर्चा झाली. तर आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. आमची भूमिका लोकांनी स्वीकारली म्हणूनच आमचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. आम्ही भाजप बरोबर हिंदुत्वाची भूमिका घेऊन लढलो, मग आम्ही काय चूक केली. आम्ही सेना वाचवण्याचे काम केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना मोक्का लागला, तडीपार झाले.
जिल्हाप्रमुख आमच्याजवळ येऊन रडले, आम्ही काही करू शकलो नाहीत. विरोधातील पराभूत आमदारांना शंभर ते दोनशे कोटी फंड व आमच्या आमदाराला पाच ते दहा कोटी फंड मिळत असेल तर पुढच्या वेळी कोणत्या तोंडाने मते मागणार ? आमच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने यश मिळाले नाही. आम्ही मंत्र्यांसह सत्तेतून पायउतार झालो. बाळासाहेबांच्या विचारांशी आम्ही तडजोड केली नाही.
एवढे दिवस शिंदे गप्प का बसले? : केदार दिघे
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मालेगावातील भाषणानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी शिंदे यांना आनंद दिघे यांच्याबाबत एवढे काही घडले हे तुम्हाला माहीत होते, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला, असा थेट सवाल केला. माहीत असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल, असा थेट सवालही त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.